Lok Sabha Election 2024 : देशात 66 टक्के मतदान

रणरणत्या उन्हाचा सामना करत आज 13 राज्यांतील 88 जागांसाठी मतदारांनी मतदान केले. लोकसभा निवडणुकांच्या दुस्रया टप्प्यात 66.12 टक्के मतदानाची नोंद झाली असून केरळ, प. बंगालमधील काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम यंत्रणेत गडबड आणि बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी, केसी वेणुगोपाल, भूपेश बघेल, शशी थरूर, हेमा मालिनी, अरुण गोविल, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे भवितव्य आजच्या मतदानाने इव्हीएममध्ये बंद झाले आहे.

केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर, अभिनेते अरुण गोविल, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे बंधू डीके सुरेश (काँग्रेस) आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी (जेडीएस), वैभव गेहलोत आणि गजेंद्रसिंग शेखावत आदींचेही भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद झाले आहे.

ईव्हीएमची नासधूस

कर्नाटकातील चामराजनगर जिह्यात दोन गटांमध्ये मतदान बहिष्कारावरून झालेल्या हाणामारीत मतदान केंद्रावरील इव्हीएम संपूर्णपणे नष्ट झाली. जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, ग्रामस्थांनी आदल्या दिवशी पुरेशा पायाभूत सुविधांचा विकास न झाल्यामुळे मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, स्थानिक अधिकाऱयांच्या आश्वासनानंतर आणि प्रयत्नानंतर मतदान सुरू झाले.

त्रिपुरा, मणिपूरमधील प्रत्येकी एक जागा आणि राजस्थानमधील 13 जागांवर आज झालेल्या मतदानामुळे या राज्यांतील सर्व जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कर्नाटकातील 28 जागांपैकी 14, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील प्रत्येकी 8 जागा, मध्य प्रदेशातील 6 जागा, आसाम आणि बिहारमधील प्रत्येकी 5 जागा, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी 3 जागा आणि जम्मू आणि कश्मीरमधील एका जागेसाठीही मतदान झाले.

विशेष सशस्त्र दलाच्या जवानाची आत्महत्या

मतदान कर्तव्यावर तैनात असलेल्या मध्य प्रदेश विशेष सशस्त्र दलाच्या एका जवानाने छत्तीसगढमधील महासमुंद मतदारसंघांतर्गत असलेल्या गरिआबंद जिह्यात मतदान सुरू असलेल्या सरकारी शाळेत आपल्या सर्व्हिस रायफलने गोळी झाडून आत्महत्या केली.

n त्रिपुराप्रमाणेच हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्येही मतदानाचा टक्का सर्वाधिक 77.08 असा होता.
n कर्नाटकात बंगळुरू सेंट्रल, दक्षिण आणि उत्तर मतदारसंघांत तुलनेने कमी मतदान झाले आहे.
n एका खासगी रुग्णालयाने बंगळुरू महापालिकेच्या मदतीने 41 रुग्णांना मतदान करण्यास मदत केली.
n राजस्थानमध्ये 60 टक्के मतदान झाले. राजस्थानमधील बारमेर-जैसलमेर लोकसभा मतदारसंघात मतदानादरम्यान काही ठिकाणी काँग्रेस उमेदवार आणि अपक्ष उमेदवार यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाल्याची घटना समोर आली आहे.
n उत्तर प्रदेशातील आठ लोकसभा मतदारसंघात 53.71 टक्के मतदान झाले. गौतम बुद्ध नगर मतदारसंघातील नोएडामध्ये सकाळपासूनच ज्येष्ठ नागरिकांनी मतदानासाठी उत्साहाने रांगा लावल्या होत्या. काही रहिवाशांच्या कल्याणकारी संघटनांनी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांची व्यवस्था केली होती.
n मध्य प्रदेशात 58.35 टक्के, प. बंगालमध्ये 72 टक्के आणि बिहारमध्ये 58.58 टक्के मतदान झाल्याची प्राथमिक आकडेवारी होती.

105 वर्षांच्या आजीबाईंनी केले मतदान

आंध्र प्रदेशमधील कंधार तालुक्यातील गुंटूरमधील 105 वर्षांच्या आजीबाईंनी आज मतदान केले. भिवराबाई मुंडकर असे या आजीबाईंचे नाव आहे. त्यांनी आतापर्यंत एकही मतदान चुकवलेले नाही. त्यामुळे मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्या म्हणाल्या, लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आपल्याला मिळाला आहे. माझ्या एका मताने काय फरक पडणार, असा विचार करू नका. प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. एका मताने बदल होतो याची मला जाणीव आहे. त्यामुळे मी स्वतः तर मतदान केलेच, पण घर आणि बाहेरच्यांनाही मतदान करण्यासाठी आग्रह करत असते.