अबब… शून्य धावांत 7 विकेट टिपले; इंडोनेशियन महिला क्रिकेटपटूचा विश्वविक्रम

महिला आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये इंडोनेशियाच्या फिरकीपटू रोहमालिया हिने गोलंदाजीमध्ये नव्या विश्वविक्रमाची नोंद केली आहे. बाली येथे मंगोलियाविरुद्ध झालेल्या पाचव्या टी-20 सामन्यात रोहमालियाने 3.2 षटकांत 0 धावा देत तब्बल 7 फलंदाज तंबूत धाडत एक अनोखा विश्वविक्रम प्रस्थापित केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यातच तिने या विक्रमाला गवसणी घातली आहे.

रोहमालियाच्या आधी नेदरलँड्सची वेगवान गोलंदाज फ्रेडरिक ओव्हरडाइकने 2021 टी-20 वर्ल्ड कप पात्रता फेरीत फ्रान्सविरुद्ध 3 धावांत 7 विकेट घेतल्या होत्या. ओव्हरडाइकनंतर महिला टी-20 मध्ये एका सामन्यात सात विकेट घेणारी रोहमालिया तिसरी गोलंदाज ठरली आहे. या दोघींव्यतिरिक्त अर्जेंटिनाच्या ऑलिसन स्टॉक्सने पेरूविरुद्ध 3 धावांत 7 विकेट टिपले होते.

इंडोनेशिया आणि मंगोलिया यांच्यातील सामन्यात नी पुटू आयु नंदा साक्रिनीच्या 61 धावांच्या जोरावर इंडोनेशियाने 5 बाद 151 धावा केल्या. प्रत्युत्तरात मंगोलियाचा संघ 24 धावांत गारद झाला. इंडोनेशियाने हा सामना 127 धावांनी जिंकला. रोहमालियाने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली आणि तिने फक्त 20 चेंडूच गोलंदाजी करीत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.