कल्पेश कोळीची फटकेबाजी 4 मेपासून

गेली 31 वर्षे शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबच्या माध्यमातून आयोजित होणारी कल्पेश गोंिवद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेची फटकेबाजी यंदा 4 ते 25 मेदरम्यान मुंबईतील विविध मैदानांवर पाहायला मिळणार आहे. बाद पद्धतीने होणाऱया या स्पर्धेत एकून 24 संघ सहा गटांमध्ये खेळविली जाणार आहे.

मुंबई क्रिकेट संघटनेच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिरातील 16 वर्षांखालील मुलांमध्ये खेळविल्या जाणाऱया या स्पर्धेतून मुंबई क्रिकेटला एकापेक्षा एक असे मौल्यवान क्रिकेटरत्न लाभले आहेत. या स्पर्धेत एपंदर 39 सामने होणार असून या यजमान माटुंग्यासह कांदिवली, दहिसर, विरार, डहाणू, कालिना, आरसीएफ चेंबूर, वांगणी, बदलापूर तसेच नवी मुंबईतील वाशी, बेलापूर, नेरूळ या ठिकाणी कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धेचा थरार रंगेल.

येत्या 4  मे रोजी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा माटुंग्याच्या मेजर रमेश दडकर मैदानावर हिंदुस्थानी कसोटीपटू सरफराज खान, कसोटी पंच वृंदा राठी, ज्येष्ठ अभिनेते संजय मोने यांच्या उपस्थितीत पार पडेल तर 25 मे रोजी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ याच मैदानावर आयोजित केला जाईल.

ज्येष्ठ क्रीडापटू आणि क्रीडा पत्रकाराचा सत्कार

मैदान क्रिकेटमधील ज्येष्ठ क्रीडापटूला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्याचे न्यू हिंदने गेल्या वर्षीच जाहीर केले होते. यंदाही तो पुरस्कार दिला जाणार आहे. तसेच क्रीडा पत्रकारितेतील एका पत्रकाराचा ज्येष्ठ पत्रकार वि. वि. करमरकर यांच्या स्मरणार्थ मानचिन्ह देऊन गौरव केला जाणार असल्याचे न्यू हिंदचे अध्यक्ष भास्कर अय्यर यांनी सांगितले. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी यंदाही मुंबई क्रिकेट संघटनेचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. तसेच स्पर्धेत सहभागी 480 खेळाडूंना प्रथमच विम्याचे संरक्षण देण्याचा न्यू हिंदचा प्रयत्न असल्याची माहिती कल्पेश कोळी स्पर्धेचे सचिव चंदू कोळी यांनी दिली.