दिल्ली जिंकण्यासाठी मुंबई सज्ज

राजस्थानविरुद्धचा दारुण पराभव विसरून मुंबईचा संघ आयपीएलमध्ये आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दिल्लीविरुद्ध भिडणार आहे, तर गुजरातविरुद्ध थरारक विजयाने मनोधैर्य उंचावलेला दिल्लीचा संघ आणखी एक जोरदार कामगिरीसाठी सज्ज झाला आहे. दोन्ही संघांसाठी विजय आवश्यक असून मुंबईला विजय थेट पाचव्या क्रमांकावर पोहचवू शकतो, तर दिल्ली जिंकली तर तिसऱया किंवा चौथ्या स्थानी झेप घेऊ शकते. त्यामुळे दिल्ली कोण जिंकते याकडे साऱयांचेच लक्ष लागले आहे.

आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थानी संघाची निवड दिल्लीतच होणार आहे आणि या निवडीपूर्वी निवड समितीला प्रभावित करण्यासाठी सारेच दावेदार प्रयत्न करतील, यात वाद नाही. मात्र उद्या होणाऱया सामन्यात ऋषभ पंतच्या खेळावर सर्वांचे लक्ष असेल. जसप्रीत बुमराविरुद्ध त्याची लढत रंगावी अशी अपेक्षा आहे. पंतच्या बॅटमधून निघणारा धावांचा पाऊस त्याचे हिंदुस्थानी संघातील स्थान आणखी बळकट करील. हिंदुस्थानी संघात यष्टिरक्षकाच्या भूमिकेसाठी एकाच वेळी तीन-तीन तगडे दावेदार असल्यामुळे कुणाला निवडायचे आणि कुणाला डावलायचे, हा यक्षप्रश्न निवड समितीपुढे उभा ठाकला आहे.

अभी नहीं तो आगे नहीं…

हिंदुस्थानी संघात स्थान मिळवण्यासाठी मुंबईमधून हार्दिक पंडय़ा आणि दिल्लीकडून ऋषभ पंतसह, अक्षर पटेल, मुकेश कुमार यांची नावे चर्चेत आहे. या सामन्यातील जोरदार कामगिरी कुणाचेही भाग्य फिरवू शकते. त्यातच हार्दिक पंडय़ाचे अष्टपैलूत्व कमकुवत झाल्यामुळे त्याचे स्थानही डळमळीत झाले आहे. याचा लाभ उठवत अक्षर पटेलला आपल्या खेळाची चमक दाखवून निवड समितीचे लक्ष आपल्याकडे खेचण्याची संधी आहे. जर आज ते खेळले तर त्यांच्या नावाचा नक्कीच विचार केला जाईल. त्यामुळे उद्याच्या सामन्यातील खणखणीत कामगिरी त्यांचे स्थान बळकट करू शकते.