अमेरिकेत वर्णद्वेषाचा आणखी एक बळी; पोलिसी खाक्यामुळे एका कृष्णवर्णीयाचा मृत्यू

2020 मध्ये पोलिसांकडून मारल्या गेलेल्या जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येची आठवण येईल असा प्रकार अमेरिकेत पुन्हा घडला आहे. ओहायो पोलिसांमुळे अमेरिकेत वर्णद्वेषी मानसिकतेचा आणखी एक बळी गेला आहे.

कँटन पोलीस विभागाने गुरुवारी या घटनेचा बॉडी कॅमेरा व्हिडीओ प्रसृत केला. फ्रँक टायसन या कृष्णवर्णीयाला पोलिस पकडताना त्या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. एका अपघातामध्ये फ्रँक न थांबता निघून गेल्याचा पोलिसांना संशय होता. एका बारमध्ये जेव्हा त्याला पकडण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला तेव्हा त्यांच्यात वाद झाला. पण त्याला जमिनीवर दाबून धरत पोलिसांनी त्याला हातकडी घातली. यावेळी एकाने त्याच्या मानेजवळ पाठीवर गुडघा रोवला होता.

यावेळी, मी घुसमटलो आहे, मला श्वास घेता येत नाही, असे टायसन सारखा ओरडत होता. नंतर तो जमिनीवर निश्चल पडलेला दिसल्यावर पोलिसांनी त्याची नाडीही तपासली.  पण तोपर्यंत फ्रँकचा जीव गेला होता.

पोलिसांचे हे सर्व वर्तन व्हिडीओत टिपले गेले आहे. एका स्थानिक वृत्तवाहिनीनुसार, टायसनचा रुग्णालयात मृत्यू झाला. अमेरिकेतील वर्णद्वेषी मानसिकतेने आणखी एक बळी घेतला आहे.