ब्लू व्हेल चॅलेंज गेममुळे विद्यार्थ्याची आत्महत्या

अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या एका हिंदुस्थानी विद्यार्थ्याचे आत्महत्येचे प्रकरण समोर आले आहे. ही घटना मार्चमधील आहे. फर्स्ट इअरच्या विद्यार्थ्याने गेम खेळता खेळता आपला जीव दिला. त्यामुळे या आत्महत्येमागे ब्लू व्हेल चॅलेंज नावाचा गेम आहे, असे बोलले जात आहे. या गेममुळे अनेक मुलांनी आत्महत्या केल्या आहेत. या गेमला सुसाईड गेमसुद्धा म्हटले जाते.

20 वर्षीय तरुण मॅसाचुसेट्स विद्यापीठात प्रथम वर्षाला शिकत होता. हा विद्यार्थी 8 मार्च रोजी मृतावस्थेत आढळला होता. ब्रिस्टल काऊंटी डिस्ट्रिक्ट अटॉर्नीचे प्रवक्ते ग्रेग मिलियोट यांनी म्हटले की, या प्रकरणाचा तपास आत्महत्या अँगलने केला जात आहे. सुरुवातीला विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली असे बोलले गेले. पोलिसांनी अधिकृतपणे आत्महत्येला दुजोरा दिला नाही. परंतु ही आत्महत्या ब्लू व्हेल चॅलेंज गेममुळे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.