सुरक्षा दलाला मोठे यश; गडचिरोलीत रेपनपल्लीच्या जंगलात चार नक्षलवाद्यांना कंठस्नान

अहेरी तालुक्यात येणाऱ्या रेपनपल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मंगळवारी पहाटे चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले असून त्यांनी चार नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. पोलिसांनी परिसरात शोध मोहीम राबवली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे हे मोठे यश आहे. अहेरी उपपोलीस मुख्यालयातून सी-60 आणि सीआरपीएफ क्यूआरटीची पथकांनी अतिरिक्त एसपी ऑपरेशन यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली परिसरात शोधमोहीम सुरु केली आहे.

परिसरात असलेल्या कोलामार्का जंगलात मंगळवारी पहाटे सुरक्षा दलाची शोध मोहीम सुरू असताना सी-60 दलाच्या एका पथकावर नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल जवांनानीही गोळीबाराला सुरुवात केली. गोळीबार थांबल्यानंतर जवानांनी परिसराची झडती घेतली असता पोलिसांनी 4 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. गोळीबाराच्या ठिकाणाहून एक एके 47, एक कार्बाइन आणि 2 देशी बनावटीचे पिस्तूल, नक्षलवादी साहित्य जप्त करण्यात आले आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये डीव्हीसीएम वर्गेश, डीव्हीसीएम मागटू, पलटन सदस्य कुरसंग राजू आणि पलटन सदस्य कुडिमेट्टा व्यंकटेश यांचा समावेश आहे. त्यांच्यावर 36 लाखांचे इनाम ठेवण्यात आले होते. या नक्षलवाद्यांना कंठस्नान घालत सुरक्षा दलाने मोठे यश मिळवले आहे.