धमकी देणाऱयाला माझा नंबर द्या! सुप्रिया सुळे यांचे मतदारांना आवाहन

ही निवडणूक आता महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने हातात घेतली आहे. लोक दबक्या आवाजात फोन करतात आणि मला सांगतात मला धमकीचे फोन आले होते. पण सगळ्यांना मी सांगते जो तुम्हाला धमक्या देतो आहे ना त्याला फक्त माझा नंबर द्या. कारण ते (अजित पवार) ज्यांना दिल्लीत घाबरतात त्यांच्यासमोरच मी आणि अमोल कोल्हे भाषण करतो आणि अगदी निडरपणे भाषण करतो, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना टोला लगावला.

पुण्यात झालेल्या भाषणात सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीची भूमिका मांडत भाजप, नरेंद्र मोदी आणि अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. आधी देश, मग राज्य, त्यानंतर पक्ष त्यानंतर आम्ही हेच धोरण घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस काम करतो आहोत, असे त्या म्हणाल्या.

माझा कार्यअहवाल त्यांनी वाचला नसावा.
माझ्यावरही अमोल कोल्हेंसारखीच टीका केली जाते की मी दहा वर्षांत केंद्रातला कुठलाच निधी आणला नाही. मी विनम्रपणे त्यांना सांगू इच्छिते की माझा मराठीत असलेला कार्य अहवाल तुम्ही वाचला नसेल. तो कार्य अहवाल मी सगळ्यांना पाठवणार आहे. माझा कार्य अहवाल जर तुम्ही वाचला तर जे सगळे टीका करणारे मलाच मतदान करतील याची मला गॅरंटी आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

विधानसभेसह सर्व निवडणुका सर्व ताकदीने लढू!

मला माहीत आहे उन्हाळा वाढला आहे. त्यामुळे बर्फ लागतो आहे म्हणजेच आयसीई (म्हणजे आईस), इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी. आपण रिकाम्या हातानेच जाणार आहोत. आम्हाला काही घाबरायची भीती नाही. वैयक्तिक टीका काही झाले तरीही करणार नाही. एक गोष्ट तुम्हाला सांगते, इतके दिवस मोठय़ांचा मान म्हणून ग्रामपंचायत, कारखाना, जिल्हा परिषद, दूध संघ यामध्ये लक्ष घातले नाही. पण लोकसभा झाल्यानंतर विधानसभा होईल, त्यानंतर ग्रामपंचायत, कारखाना, सोसायटी, कॉर्पोरेशन ज्या निवडणुका होतील त्यात महाविकास आघाडी ताकदीने लढणार आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.