चंद्राला हिंदू राष्ट्र घोषित करा, स्वामी चक्रपाणि महाराजांची अजब मागणी

इस्रोची चांद्रयान 3 मोहीम यशस्वी झाली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा हिंदुस्थान पहिला देश बनला आहे. जिथे विक्रम लँडर उतरला त्या जागेचं शिव-शक्ती पॉईंट असं नामकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आता यावरून संत महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणि महाराज यांनी एक अजब मागणी केली आहे.

चंद्राला लवकरात लवकर हिंदू राष्ट्र घोषित करा, तसंच शिव-शक्ती पॉईंटला चंद्राची राजधानी म्हणून घोषित करा, अशी मागणी चक्रपाणि महाराजांनी केली आहे. ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करून त्यांनी ही मागणी केली आहे. त्या व्हिडीओत महाराज म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी आभार मानतो की त्यांनी चंद्रावर लँडर जिथे उतरला त्या जागेचं नाव शिव-शक्ती पॉईंट ठेवलं. पण, मला वाटतं की अन्य कोणत्याही विचारधारेला समर्पित असलेले देश तिथे जातील आणि गजवा ए हिंद बनवतील, त्या पूर्वी चंद्राला हिंदू राष्ट्र घोषित करण्यात यावं. त्यासाठी संसदेत प्रस्तावही पारित करण्यात यावेत. तसंच, शिवशक्ती पॉईंट ही त्याची राजधानी घोषित करण्यात यावी, अशी मागणी चक्रपाणि महाराजांनी केली आहे.

तसंच, चंद्र भगवान शंकराच्या माथ्यावर असतो, त्यामुळे हिंदूंचा चांदोमामाशी जुना संबंध आहे. त्यामुळे चंद्राची शुद्धता आणि पावित्र्य तसंच राहायला हवं, अशीही मागणी त्यांनी केली आहे. ही अजब मागणी कळल्यानंतर नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत.