राखी सावंतमुळे 2 मुलांनी आत्महत्या केली, नाना पाटेकरांवर ‘मी टू’चे आरोप करणाऱ्या अभिनेत्रीचा दावा

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत आणि तिचा पती आदिल खान दुर्रानी यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. राखी आणि आदिल एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. राखीच्या आरोपांमुळे आदिलला तुरुंगवासही झाला होता. त्यामुळे दोघांमधून सध्या विस्तवही जात नाही. आता दोघांमधील या वादामध्ये नाना पाटेकरांवर ‘मी टू’चे आरोप करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने उडी घेतली आहे.

तनुश्री दत्ता हिने आदिल खान दुर्रानी याच्यासोबत एक संयुक्त पत्रकार परिषद घेत राखी सावंत हिच्यावर तोफ डागली आहे. राखी सावंत हिच्यामुळे दोन मुलांनी आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप तनुश्री दत्ता हिने केला आहे. यामुळे चित्रपटसृष्टीमध्ये खळबळ उडाली आहे. तनुश्री दत्ता म्हणाली की, आज मी संपूर्ण देशाला सांगू इच्छिते की राखी सावंत सायकोपॅथ आणि खोटारडी आहे. माझ्या चारित्र्यावर नको नको त्या टिप्पणी तिने केल्या. तिचे सर्व दावे खोटे आणि बनावट होते. ती दर पाच मिनिटांनी खोटे बोलते. ती एवढ्या खालच्या पातळीवर जातेय की आपण विचारही करू शकत नाही.

राखी सावंत हे बॉलिवूडमधील एक साईड कॅरेक्टर आहे. इतरांच्या मुद्द्यांमध्ये ती विनाकारण नाक खुपसते आणि गोंधळ घातले. बॉलिवूडमध्येही असे अनेक गुंड आहेत जे चुकीच्या गोष्टी करतात आणि राखी सावंतसारख्या एक-दोघांना सांभाळतात. काही चुकले की राखीला कॉल करतात, पैसे देतात आणि ती सक्रिय होते, असे तनुश्री म्हणाली.

तिची एक घटना आजपर्यंत मीडियासमोर आली नव्हती. तिच्यामुळे दोन मुलांनी आत्महत्या केली होती. ती दोन मुलं राखीचा सामना करू शकत नव्हते आणि त्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणी राखीवर केसही दाखल झाले. मुलांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याची केस तिच्याविरोधात दाखल आहे, असा दावा तनुश्री हिने केला.

तनुश्री समलैंगिक

दरम्यान, ‘मी टू’ मोहिमेवेळी राखी सावंत हिने तनुश्री दत्ता हिच्या चारित्र्यावर टिप्पणी केली होती. तनुश्री समलैंगिक असून आपल्यासोबत सतत दुष्कर्म करते असा दावा राखीने केला होता. तसेच ती आपल्याला रेव्ह पार्टींना घेऊन जाते असेही ती म्हणाली होती.