तंत्र पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचे!

>> किरण खोत, (निवेदक, सूत्रसंचालक) 

व्यावसायिक सभा किंवा आपल्या ऑफिसमध्ये आपल्याला आपले मत हे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन देऊन मांडावे लागते. एखादा प्रोजेक्ट किंवा एखादी संकल्पना पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून समोरच्याला उत्तमरीत्या समजते. उत्तम पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचेही एक तंत्र आहे.

तुमच्या वेळेप्रमाणे तुम्हाला एकूण किती स्लाइड तुम्ही प्रेझेंट करणार आहात, समोरच्या श्रोत्यांची बौद्धिक क्षमता काय आहे, ते कोणत्या वयाचे आहेत, त्यांची शैक्षणिक अर्हता काय आहे, त्यांचा अनुभव काय आहे आणि सगळय़ात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही बोलण्या अगोदर ते किती वेळ इतर वक्त्यांना ऐकत आहेत व तुम्ही बोलल्यानंतर ते किती वेळ इतर वक्त्यांना ऐकणार आहेत? या सर्व मुद्दय़ांवरून तुमच्या एकूण स्लाइडची संख्या ठरायला हवी.

स्लाइड तयार करत असताना तुमच्या कंपनीच्या लोगोचा रंग आणि त्याच्याशी असणारी रंगसंगती यांचा विचारविनिमय करून स्लाइडचे बॅकग्राऊंड निश्चित करावे. प्रत्येक स्लाइडमध्ये आकर्षक चित्रे किंवा व्हिडीओज असावेत. कमीत कमी शब्द स्लाइडमध्ये असावेत. जो मुद्दा तुम्हाला समजावून सांगायचा आहे त्यातला शब्द स्लाइडमध्ये न मांडता त्याऐवजी त्या विषयाशी संबंधित असणारे चित्र किंवा व्हिडीओ जर तुम्ही दाखवला आणि त्यानंतर तुमचा मुद्दा तुम्ही तोंडी स्पष्ट केला तरच लोक तुमच्याकडे लक्ष देतील. अन्यथा तुमची स्लाइड वाचताच तुम्हाला काय म्हणायचे आहे हे लोकांच्या लक्षात येईल आणि त्यांचे तुमच्याकडचे असणारे अवधान कमी होईल.

तुमच्या स्लाइडमध्ये तुम्ही वापरलेले फॉन्ट हे डोळय़ांना सुखावणारे असावेत. बरेचदा स्लाइडमध्ये वापरल्या जाणाऱया चित्रांमधली माणसे ही परदेशातली असतात आणि त्यामुळे ऐकणारा श्रोता हा जर हिंदुस्थानी असेल तर तो त्या चित्रांची तुलना स्वतःसोबत करताना संभ्रमात पडतो.  मुद्दा मांडत असताना तुम्हाला प्रोजेक्टर आणि क्रीनच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला उभे राहून योग्य देहबोलीतून आपला मुद्दा मांडता आला पाहिजे. बोलत असताना प्रोजेक्टर आणि क्रीनच्या मधून चालणे किंवा बोलताना क्रीनच्या आड येणे हे अयोग्य लक्षण आहे. त्यामुळे स्लाइडवरची अक्षरे किंवा इमेजेस तुमच्या चेहऱयावर किंवा कपडय़ांवर दिसतात. जे श्रोत्यांसाठी किंवा प्रेक्षकांना मुद्दा समजण्यासाठी कठीण जाऊ शकते.

कमीत कमी शब्द, आकर्षक चित्र आणि व्हिडीओ, उत्तम देहबोली आणि वेळेचे व्यवस्थापन करत आपण आपले सादरीकरण निर्भीडपणे अगदी सहज संवाद साधत करावे.

पूर्ण पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सादरीकरण करून झाल्यानंतर शेवटच्या स्लाइडमध्ये पुन्हा एकदा संपूर्ण प्रोजेक्टचा किंवा मुद्दय़ाचा सारांश तुम्हाला सांगता आला पाहिजे आणि त्यातून तुम्हाला नक्की काय साध्य करायचे आहे, याविषयीची कल्पना देता आली पाहिजे.