चंद्रावर घर देतो म्हणतील, विश्वास ठेवू नका! शेतातलं घर गहाण टाकावं लागेल!! उद्धव ठाकरे यांचा आसुड कडाडला

निवडणुका जवळ येताहेत. काही लोक म्हणतील, भाईयो और बहनोंअभी अभी चांद्रयान चांदपर गया हैं.. मैं वादा करता हूँ, 2030 पर्यंत सर्वांना चंद्रावर घर देईनपरंतु विश्वास ठेवू नका. चंद्र राहिला दूरतुमचं शेतातलं घर गहाण टाकावं लागेल, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जनतेला सावध करत जुमलेबाज भाजपला फोडून काढले.

हिंगोली येथील रामलीला मैदानावर उद्धव ठाकरे यांची न भूतो न भविष्यति अशी निर्धार सभा झाली. सभेला तुफान गर्दी झाली होती. मैदानावर जेवढे लोक होते, त्यापेक्षा कैकपट जास्त गर्दी मैदानाबाहेर होती. उद्धव ठाकरे यांचे व्यासपीठावर आगमन होताच ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला’ अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमला. यावेळी शिवसैनिकांनी ‘पन्नास खोके, एकदम ओक्के’ अशा घोषणाही दिल्या. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, मी गद्दारांवर बोलून वेळ घालवणार नाही. कारण गद्दाराला चिरडण्यासाठी तुम्ही समर्थ आहात. हिंगोली कायम भगव्याचे राहिले आहे. आता काही गद्दार बेटकुळय़ा दाखवतात, पण त्यात काही दम नाही नुसतीच हवा आहे. खरी ताकद ही इथे माझ्यासमोर बसलेली आहे! असे उद्धव ठाकरे म्हणताच उपस्थित गर्दीने शिवसेनेचा जयघोष केला.

हा नाग उलटा फिरून डसायला आला

शिवसेनेशी गद्दारी करणारे आमदार संतोष बांगर यांना उद्धव ठाकरे यांनी यावेळी नामोल्लेख न करता ठेचून काढले. नुकत्याच झालेल्या नागपंचमीचा दाखला देत ते म्हणाले की, या गद्दाराला नाग समजून पूजा केली, मात्र हा नाग उलटा फिरून डसायला लागला. पुंगी वाजवली, दूध पाजलं, पण सगळं वाया गेलं. साप पायाखाली आल्यावर काय करायचं तुम्हाला कळतं, असे उद्धव ठाकरे पुढे म्हणताच उपस्थितांमधून ‘चिरडायचा’ असे जोरदार उत्तर आले.  अवघ्या सभेतून नाव हिंदुत्वाचे सांगायचे आणि धंदे मात्र बोगस! मटक्याचे अड्डे म्हणजे हिंदुत्व का? असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

भाजप सुपाऱ्या वाजवण्यासाठी पक्ष आयात करतोय

भाजपच्या राजकारणात आता काही दम राहिला नाही. त्यामुळे बाहेरून सुपाऱ्या वाजवण्यासाठी पक्ष आयात केले जात आहेत, असा घणाघात यावेळी उद्धव टाकरे यांनी भाजपवर केला. केसीआर यांची बीआरएस आणि ओवेसी यांचाही त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, बीआरएसने एकदा काय ते स्पष्ट करूनच टाकावे. ते इंडियात आमच्याबरोबर आहेत का? ‘अब आयेगी किसान सरकार’ अशा घोषणा देतात. अगोदर तुमच्या घराला सुरुंग लागलाय तो बघा आणि मग आम्हाला शहाणपण शिकवा, असे खडे बोलही उद्धव ठाकरे यांनी सुनावले. ओवेसी हे भाजप नेत्यांबरोबर हात उंचावून उभे राहतात, कशाला हवा हा दुटप्पीपणा? असा संतापही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

कसले डबल, ट्रीपलनुसत्याच वाफा

राज्यातले सरकार डबल, ट्रीपल इंजिन सरकार असल्याचा गप्पा मारल्या जातात. हे कसले डबल, ट्रीपल सरकार? नुसत्याच वाफा! योजना सगळय़ा कागदावरच, अशी जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी केली. केंद्र आणि राज्य सरकारचा कारभार पाहून अगदी दया येते. सगळा बाजारबुणग्यांचा कारभार चालू आहे, असे ते म्हणाले. श्रीराम, श्रीराम असा जप करायचा आणि सगळय़ा आयारामांची वरात काढायची! ज्या कार्यकर्त्यांनी भाजपसाठी आयुष्य झिजवले ते अजूनही सतरंज्याच उचलत आहेत आणि उपरे त्यांच्या छाताडावर येऊन नाचत आहेत. भगवा फडकला हो, पण उपऱ्यांच्या दांडय़ावर! आता या डबल इंजिनाला आणखी एक तिसरे इंजिन लागले आहे, अजितदादांचे! अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपची सालटी काढली.

भरपावसात सभेचा उत्साह

रामलीला मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ज्वलंत विचार ऐकण्यासाठी तुफान गर्दी झाली होती. यात तरुणाईचे प्रमाण प्रचंड होते. सभेला सुरुवात होताच पाऊस आला. पण लोक डोक्यावर खुर्च्या घेऊन उभे राहिले. पाऊस धो धो कोसळला आणि बंद झाला. त्यानंतर लोक पुन्हा खुर्च्यावर बसले.

भाजपविरुद्ध एकत्र लढावेच लागेल

देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले. हे संविधानच आज धोक्यात आहे. हा लढा कुण्या व्यक्तीविरोधात नाही. तो लोकशाही वाचवण्यासाठी आहे. हा लढा माझा एकटय़ाचा नाही, आपल्या सगळय़ांचा आहे. लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी आपल्याला एकत्र लढावेच लागेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

भाजप कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन जाब विचारा

आता भाजपने घर घर मोदी सुरू केले आहे. भाजप कार्यकर्ते घरोघर जाऊन मोदी सरकारच्या योजनांचे भजन गाणार आहेत. आता तुम्ही एक काम करा. भाजप कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांना प्रश्न विचारा, उज्ज्वलाचा गॅस मिळतो का, नमो किसानचे पैसे आले का, महागाई कमी झाली का, 24 तास वीज मिळते का, पाणी येते का? आता होऊनच जाऊ द्या चर्चा… पारावर, चावडीवर, घरात… असा जाहीर कार्यक्रमच उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला.

रावसाहेब दानवे बोलले ते खरेच

छत्रपती संभाजीनगरची जागा जिंकायची असेल तर आम्हाला एमआयएमला उभे करावेच लागते असे भाजपचे नेते रावसाहेब दानवे म्हणाले होते. त्याचा दाखला देत यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, दानवे बोलले ते खरेच आहे. यांच्याच टीम आहेत. ए, बी. ओवेसीचे भाजप नेत्यांसोबत हातात हात घातलेले फोटो अलीकडेच पाहण्यात आले. मतांची विभागणी करायची आणि भाजपचा मार्ग मोकळा करायचा असा हा गोरखधंदा आहे.

गरीबांच्या घराचा सत्यानाश करण्याचे भाजपचे षड्यंत्र

 निवडणुकीच्या अगोदर जानेवारीत अयोध्येतील राममंदिराचे उद्घाटन होणार आहे. राममंदिराचा आदेश न्यायालयाने दिला. राममंदिर बांधण्यासाठी पैसे लोकांनी दिले. बाबरी तुम्ही पाडली नाही. आता हा सोहळा होणार आहे. त्यासाठी देशाभरातून लाखोंच्या संख्येने रामभक्त येतील. परत जाताना त्यांच्यावर मुस्लिम वस्त्यांमधून दगडफेक करून दंगल घडवण्याचा कट शिजत असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट तृणमूलच्या महुआ मोईत्रा आणि माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला आहे. अतिशय गंभीर असा हा आरोप असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. गरीबांच्या घराचा सत्यानाश करण्याचे भाजपचे षड्यंत्र असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, पक्षाचे सचिव विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर, उपनेते लक्ष्मण वडले, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, खासदार संजय जाधव, पोहरादेवी संस्थानचे सुनील महाराज राठोड, माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी आमदार डॉ. संतोष टारफे, नागेश पाटील आष्टीकर, रोहिदास चव्हाण, जिल्हाप्रमुख विनायक भिसे व संदेश देशमुख आदी उपस्थित होते.

लोक रांगा लावून उभे राहिले

रामलीला मैदानावर रविवारी गर्दीचे तुफानच उसळले होते. मैदानावर जेवढी गर्दी होती, त्यापेक्षा दुप्पट गर्दी बाहेर होती. शिवसैनिक वाजतगाजत, गुलाल उधळत सभास्थळी येत होते. विशेष म्हणजे सभामंडपात जाण्यासाठी शिवसैनिकांनी शिस्तीत रांगा लावल्या.

दाढीवाल्याने लावली मोदी वॉशिंग पावडर

दुसऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात. आमच्याकडे असले की भ्रष्टाचारी, देशद्रोही. यांच्या मशीनमध्ये गेला की स्वच्छ! कोणती वॉशिंग पावडर? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी करताच सभेतून, ‘मोदी वॉशिंग पावडर’चा घोष झाला. त्यावर आपल्याही दाढीवाल्याने लावली यांची वॉशिंग पावडर, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आणि एकच हशा पिकला.

जगातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपमध्ये चांगले कर्तबगार नेते नाहीत? यांना नेते बाहेरचे लागतात, वडील माझे लागतात! यांच्या दिल्लीतल्या वडिलांमध्ये हिंमत नाही, स्वतःच्या नावावर मते मागण्याची? आम्हाला ताकद दाखवतात. कसली ही ताकद? ही नामर्दानगी आहे.

फडणवीसांना थापाडय़ा म्हणायचे होते, पण…

राज्यात दुष्काळ असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जपानमध्ये होते, टरबुजालाही पाणी लागते, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी फटकेबाजी केली. फडणवीस यांच्याबद्दल मी काही बोललो की बोभाटा होतो म्हणून आता मी त्यांना फडतूस-बिडतूस म्हणणार नाही, कलंक म्हणणार नाही. मला त्यांना थापाडय़ा म्हणायचे होते, पण आता तेही म्हणणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे बोलत असतानाच गर्दीतून पुन्हा ‘टरबूज… टरबूज’ असा आवाज आला. त्यावर तेसुद्धा मी म्हणणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणताच उपस्थितांमध्ये पुन्हा खसखस पिकली. फडणवीस यांच्यावर त्यांनी टीकाही केली. उपमुख्यमंत्री इकडे दुष्काळ पडलेला असताना तिकडे जपानला गेले. डॉक्टरेट घेतली आणि परत आले. महाराष्ट्रात आलेले उद्योग तुमच्या डोळय़ादेखत गुजरातला पळवले गेले त्यावरही बोला, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हिमंत असेल तर बिल्किस बानोकडून राखी बांधून घ्या!

मुस्लिम महिलांकडून रक्षाबंधन करून घ्या असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना केले आहे. त्यावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतून फुटलेल्या खासदार भावना गवळी यांच्यावरही निशाणा साधला. गेल्या वर्षी देशात एक रक्षाबंधन झाले होते, राखी बांधली… ईडी थांबली, असे उद्धव ठाकरे म्हणाले. हिंमत असेल तर बिल्किस बानोच्या घरी जाऊन तिच्याकडून राखी बांधून घ्या, असे आव्हानही त्यांनी पंतप्रधान मोदी यांना आज पुन्हा एकदा दिले.

सरकार आपल्या दारी, थापा मारतंय लय भारी

शेतकरी आणि कांदा उत्पादकांवर अन्याय करणाऱ्या मिंधे सरकारवर उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्ला चढवला. सरकार आपल्या दारी, थापा मारतंय लय भारी, अशी खिल्ली उद्धव ठाकरे यांनी उडवली. पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल झाला असताना मिंधे सरकार मात्र ‘सरकार आपल्या दारी’ करत बसलेय, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीचेच पैसे अजून शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. दुष्काळ तोंडावर आ वासून उभा आहे. आगीत तेल म्हणजे कांद्यावरील निर्यात शुल्क वाढवण्यात आले. का वाढवले हे शुल्क? उलट सरकारनेच शेतकऱ्यांना पैसे दिले पाहिजेत. परवडणाऱ्या दरात सरकारने कांदा उपलब्ध करून दिला पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

सबको लाथ, दोस्तों का विकास…

फक्त निवडून येईपर्यंतच भाजपचेसबका साथ, सबका विकासअसते. एकदा निवडून आले कीसबको लाथ, अपने दोस्तों का विकासअसे नवीन पर्व भाजपने सुरू केले आहे. पण ही मित्रशाही आता चालणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

आम्हाइंडियावाल्यांना इंडियन मुजाहिदीन म्हणता. इंडियन मुजाहिदीनला कोणता देश पाठिंबा देतो?…पाकिस्तान! आणि त्या पाकिस्तानबरोबर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्ड कपची मॅच खेळवता! हे कोणते हिंदुत्व?