शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश, कोकणातील गणेशभक्तांना टोलमाफी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱया गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफी देण्यात यावी यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. राज्य शासनाने आज यासंदर्भात निर्णय घेत टोलमाफी जाहीर केली.

16 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील टोलनाक्यांवर गणेशभक्तांना टोल भरावा लागणार नाही. फक्त त्यांना कोकणात जाताना आपल्या वाहनांवर पोलीस किंवा परिवहन विभागाकडून देण्यात येणारे टोलमाफीचे पास लावावे लागणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने आज यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.

दरवर्षी मुंबईतून मोठय़ा प्रमाणात कोकणवासीय खासगी वाहनांनी गणेशोत्सवासाठी कोकणात जात असतात. कोकणात जाणाऱया मार्गांवर अनेक ठिकाणी टोलनाके आहेत. गेल्या काही वर्षांपासून कोकणात जाणाऱया गणेशभक्तांना सरकारकडून टोलमाफी देण्यात येत आहे. यंदा गणेशोत्सव तोंडावर आला असतानाही त्यासंदर्भात घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे याबाबत पाठपुरावा करून सरकारला टोलमाफीचा निर्णय घेण्यास भाग पाडावे, असे निवेदन शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने 12 ऑगस्ट रोजी शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते, आमदार अजय चौधरी यांना दिले होते.

अजय चौधरी यांनी तातडीने 13 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना यासंदर्भात पत्र दिले. कोकणातील गणेशभक्तांसाठी टोलमाफीचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा अशी मागणी त्यांनी त्या पत्रात केली होती. मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडल्याने मुंबईकर कोकणवासी पुणे, कोल्हापूरमार्गे कोकणात जातात. त्या मार्गांवर अनेक टोलनाके असल्याचेही आमदार चौधरी यांनी या पत्रात नमूद केले होते.

शिवसेनेच्या पाठपुराव्यानंतर सरकारने आज टोलमाफी जाहीर केली. टोल सवलतीसाठी ‘गणेशोत्सव 2023, कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टिकर्स स्वरूपाचे टोलमाफी पास, त्यावर वाहन क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहून परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, आरटीओ यांनी पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये उपलब्ध करून द्यावेत असेही आदेश देण्यात आले आहेत. हाच पास परतीच्या प्रवासाकरितादेखील ग्राह्य धरण्यात येणार आहे.