विम्बल्डनच्या हिरवळीवर आजपासून थरार, अग्रमानांकित अल्काराझ आपले दुसरे ग्रॅण्डस्लॅम जिंकण्यासाठी सज्ज

टेनिस जगतातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठsची स्पर्धा असलेल्या विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेचा थरार सोमवारपासून सुरू होतोय. ऑल इंग्लंड क्लबच्या हिरवळीवर सुरू होणाऱ्या या स्पर्धेत अव्वल मानांकित 20 वर्षीय कार्लोस अल्काराझच्या रूपाने नवा विजेता मिळण्याची शक्यता आहे. कारण गेल्या 20 वर्षांत रॉजर फेडरर, राफेल नदाल, नोवाक जोकोविच व अॅण्डी मरे यांनीच फक्त ही स्पर्धा जिंकलेली आहे.

गतवर्षी सर्बियाचा नोवाक जोकोविच व कझाकिस्तानची एलिना रिबाकिना यांनी विम्बल्डन स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले होते. यंदाच्या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत सदाबहार टेनिसपटू रॉजर फेडरर खेळणार नाही. कारण गतवर्षीच त्याने निवृत्ती घेतलेली आहे. याचबरोबर दुखापतीमुळे राफेल नदालसारखा मातब्बर खेळाडूही या स्पर्धेत दिसणार नाही. त्यामुळे अनुभवी नोवाक जोकोविच आणि नव्या दमाचा कार्लोस अल्काराझ यांना या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविण्याची सर्वाधिक संधी असेल, असा टेनिसप्रेमींचा अंदाज आहे.

महिला गटात जपानची नाओमी ओसाका व अमेरिकेची अमांडा अनिसिमोवा यांनी मानसिकदृष्टय़ा सक्षम होण्यासाठी सध्या टेनिसमधून ब्रेक घेतलेला आहे. क्रोएशियाची मेरिन किलिच, अजला मिलानोविच या दोघी गुडघ्याच्या दुखापतीमुळे यंदाच्या विम्बल्डनमध्ये खेळणार नाहीये. फ्रेंच ओपनमध्ये जायबंदी झालेल्या कारेल काचानोवनेही उद्यापासून सुरू होत असलेल्या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेतून माघार घेतलेली आहे.

हिरवळीवरील स्पर्धा

टेनिस विश्वातील सर्वात जुनी म्हणजे 146 वर्षे जुनी असलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील ही 136 वी स्पर्धा होय. ही स्पर्धा ग्रास कोर्टवर म्हणजेच हिरवळीवर खेळली जाते. हिरवळीवर खेळली जाणारी ही एकमेव ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा होय. कारण फ्रेंच ओपन ही क्ले कोर्टवर, तर ऑस्ट्रेलियन व यूएस ओपन स्पर्धा हार्ड कोर्टवर खेळली जाते.

अल्काराझ, स्वीटेक यांना अग्रमानांकन

पुरुष एकेरी गटात कार्लोस अल्काराझने नोवाक जोकोविचला मागे टाकत विम्बल्डन टेनिस स्पर्धेसाठी अग्रमानांकन मिळविले. महिला गटात इगा स्वीटेक एप्रिल 2022पासून ‘नंबर वन’च्या सिंहासनावर आहे. तिने चार ग्रॅण्डस्लॅम किताबही जिंकले आहेत. स्वीटेकने नुकतेच फ्रेंच ओपनचेही विजेतेपद पटकाविलेले आहे. मात्र, विम्बल्डन स्पर्धेत ती कधीच चौथ्या फेरीच्या पुढे गेली नाही, मात्र तिला या स्पर्धेत एलेना रायबाकिना, जेसिका पेगुला, पॅरोलिन गार्सिया, ओन्स जाबूर, कोको गॉफ, मारिया सककारी, पेट्रा क्वितोवा व बारबोरा व्रेझीकोव्हा यांचे आव्हान असेल.