उत्तर प्रदेशमध्ये प्रशिक्षण आणि मुंबईत चोऱया

गरिबीमुळे झटपट पैसे कमवण्यासाठी एटीएम मशीनला पट्टी लावून पैसे काढण्याचे प्रशिक्षण घेऊन मुंबईत चोऱया करणाऱया दोघांना मालाड पोलिसांनी अटक केली. दीपककुमार मौर्या आणि दीपक सरोज अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

मालाड परिसरात एका खासगी बँकेचे एटीएम आहे. दोन दिवसांपूर्वी दुपारी बँकेच्या क्यूआरटी टीमला एक व्हिडीओ आला. दोन जण एटीएममध्ये पट्टी लावत असल्याचे त्या व्हिडीओमध्ये दिसत होते. बँकेने याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर काही वेळातच मालाड पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी पाठलाग करून मौर्याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत सरोजचे नाव समोर आले. वरिष्ठ निरीक्षक रवींद्र अडाणे यांच्या पथकातील उपनिरीक्षक तुषार सुखदेवे, सातवसे, जुवाटकर, गावंड, काटे, डोईपह्डे यांच्या पथकाने तपास सुरू केला.

सरोज हा दहिसर पूर्वच्या रेल्वे रुळाजवळ लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीनंतर पोलिसांनी तेथे सापळा रचून सरोजला अटक केली. सरोज आणि मौर्या हे दोघे उत्तर प्रदेशच्या प्रतापगडचे रहिवासी आहेत. प्रतापगड येथे त्या दोघांना एकाने एटीएमला पट्टी लावून पैसे कसे चोरायचे याचे प्रशिक्षण दिले. काही दिवस त्याने तेथे पट्टी लावून चोरीचा सरावदेखील केला. त्यानंतर दहा दिवसांपूर्वी चोऱया करण्यासाठी ते दोघे मुंबईत आले. मुंबईत त्याने चार-पाच ठिकाणी एटीएम मशीनला पट्टी लावून पैसे चोरले. चोरीचे पैसे अर्धे अर्धे वाटून घेऊन ते पुन्हा उत्तर प्रदेशला जाणार होते. त्या दोघांविरोधात तेथे गुन्हे दाखल असल्याची पोलिसांना प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्या दोघांच्या अटकेने काही गुह्यांची उकल होणार आहे.