प्रवाशांना लुटणाऱया खासगी टॅव्हल्सवर बॉण्ड स्टाईल कारवाई

खासगी बसगाडय़ांचे बुकिंग सध्या मोठय़ा प्रमाणात होत असून ते प्रवाशांकडून अवाच्या सवा तिकीट वसूल करतात. त्याचा कोकणात जाणाऱया अनेक चाकरमान्यांना फटका बसला आहे. त्याची दखल परिवहन विभागाने घेतली असून परतीच्या प्रवासात तरी चाकरमान्यांची लूट होऊ नये म्हणून ऑनलाइन बुकिंग घेणाऱया गाडय़ांचे तिकीट दराची खातरजमा करण्याचे निर्देश परिवहन आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार आरटीओचे संबंधित अधिकारी स्वतः ऑनलाइन तिकीट बुक करणार आहे. त्यामध्ये जादा अवाच्या सवा तिकीट घेतले जात असल्याचे निदर्शनास आल्यास बसचालकांवर कारवाई केली जाणार आहे.

एसटीच्या तिकिटाचा विचार करता खासगी लक्झरी बसगाडय़ांनी दीडपट तिकीट प्रवाशांकडून घेणे अवश्यक आहे. मात्र कोकण मार्गावर धावणाऱया खासगी लक्झरी बसचालकांकडून एसटीच्या तिकिटाचा विचार करता चारपट तिकीट घेतले जात असल्याचे वृत्त दै. ‘सामना’ ने नुकतेच दिले होते. त्याची दखल घेतल ऑनलाइन बुकिंग होणाऱया खासगी बस परिवहन विभागाच्या रडारवर आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना लुटणाऱया बसचालकांवर कारवाई होणार आहे.

पुरावे गोळा करण्याचे काम सुरू

ऑनलाइनद्वारे तिकीट बुकिंग करणाऱया खासगी ट्रव्हल्सकडे परिवहन विभागाचे लक्ष आहे. परतीच्या प्रवासात प्रवाशांकडून जादा भाडे आकारले जाऊ नये म्हणून आरटीओ विभागाकडून स्वतः ऑनलाइन तिकीट बुकिंग करून भाडे किती आकारले जात आहे याचे पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी दिली. तसेच ऑनलाइनच्या माध्यमातून जादा भाडे आकारणाऱयांवर निश्चित कारवाई करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.