उदयनराजे दिल्लीत, पण अमित शहा भेटतच नाहीत; समर्थकांमध्ये तीव्र संताप

सातारा लोकसभा मतदारसंघातील तिढा अद्याप सुटलेला नाही. उमेदवारी मिळावी यासाठी उदयनराजे भोसले यांना वणवण करावी लागत आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. त्यानंतरही उमेदवारीबाबत अनिश्चितता वाटू लागल्याने त्यांनी थेट दिल्ली गाठली. गेल्या दोन दिवसांपासून ते दिल्लीत ठाण मांडून आहेत, पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेटच झालेली नाही. दिल्लीत येऊनही शहा भेटत नसल्याने राजेंच्या समर्थकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

उदयनराजे भोसले साताऱयातून लोकसभेसाठी इच्छुक आहेत. त्या पार्श्वभूमीवर उदयनराजेंनी मुंबईतील सागर निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली होती. मात्र चर्चेतून त्यांचे समाधान झाले नाही. अखेर त्यांनी अमित शहा यांना भेटण्यासाठी दिल्ली गाठली. परंतु शहा हे निवडणुकीच्या प्रचारात बिझी असल्याने त्यांची भेट झालेली नाही.

उदयनराजे भोसलेंच्या उमेदवारीला महायुतीमधूनच विरोध होत असल्याने आणि मागच्या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाल्याने त्यांना तिकीट देण्याबाबत भाजप नेत्यांमध्येही संभ्रम आहे. उमेदवारीबाबत अमित शहा यांच्या दरबारातच अंतिम निर्णय शक्य असल्याने उदयनराजे शहांच्या भेटीसाठी आग्रही आहेत. कमळ चिन्हावरच निवडणूक लढवायची आहे असा त्यांचा हट्ट आहे. आज शहांची भेट होईल असे त्यांना भाजपमधून सांगण्यात आले होते, पण आजची भेटही लांबणीवर पडल्याने उदयनराजेंच्या समर्थकांची नाराजी वाढली आहे.