अन्नदात्याविरोधात पोलिसांना जवानांना उभे केले जात आहे, ही कुठली लोकशाही? उद्धव ठाकरे कडाडले

शिर्डीच्या दौऱ्यावर असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कोपरगाव इथे सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी येऊच नये यासाठी केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांबद्दल संताप व्यक्त केला. दिल्लीच्या सीमेवर पोलीस तैनात करण्यात आले आहेत, निमलष्करी दलही तैनात करण्यात आले आहे जणू दिल्लीच्या सीमेवर युद्ध सुरू आहे. शेतकऱ्यांची मुले असलेल्या पोलिसांना जवानांना त्यांच्याच आई वडिलांविरोधात गोळ्या घालायला सीमेवर उभे करता, ही कुठली लोकशाही आहे? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. भारत मातेच्या रक्षणासाठी पोलीस दलात किंवा सैन्यात भरती झालेल्यांना भारताला जगवणाऱ्या अन्नदात्याविरोधात उभे केले जात असल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.

जे बोलतो ते करतो, यालाच म्हणतात उद्धव गॅरेंटी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेतून आणि पालिकेच्या माध्यमातून तयार झालेल्या कोस्टल रोडचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 फेब्रुवारी रोजी होणार आहे. मोदी गॅरेंटीचा डंका पिटणाऱ्यांवर आज उद्धव गॅरेंटीचे लोकार्पण करण्याची वेळ येत आहे हे केवढे मोठे भाग्य आहे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. उद्धव ठाकरे जे बोलतो ते करून दाखवतो याला आता पंतप्रधान साक्ष असतील असा टोला यावेळी ठाकरे यांनी लगावला.

उद्धव ठाकरे यांनी कोपरगावच्या सभेत बोलताना भाजप आणि मोदींकडून केल्या जात असलेल्या घराणेशाहीच्या आरोपांना कडक शब्दात उत्तर दिले. ते म्हणाले की, “काँग्रेसमधून आलेली घराणेशाही चालते, शिवसेनेतून आलेली घराणेशाही चालते. अजित पवार हे देखील घराणेशाहीचेच प्रॉडक्ट आहे. ही टीनपाट लोकं चालतात मात्र ज्या वाजपेयी मोदींना कचऱ्याच्या टोपलीत टाकायला निघाले होते तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी मोदींच्या पाठीवर हात ठेवला नसता तर मोदी आज आपल्याला दिसले नसते. ती बाळासाहेबांची घराणेशाही तुम्हाला नकोय, हिंदुत्ववादी शिवसेना तुम्हाला नकोय. संघमुक्त भाजप म्हणणारा नितीश कुमार तुम्हाला पाहिजे आहे. काँग्रेस संस्कृतीत वाढलेली सगळी माणसे तुम्ही घेता आणि घराणेशाहीविरूद्ध बोंबलताय. मी आहे घराणेशाहीवाला जा काय बोलायचं ते बोला. माझ्या घराण्यावर लोकं प्रेम करतात.”