‘सबका साथ सबका विकास’ ही फक्त घोषणा; प्रत्यक्षात ‘सबको लाथ, दोस्तोंका विकास’! उद्धव ठाकरे यांचा घणाघात

आगामी निवडणुकांवेळी पंतप्रधान चंद्रावर घर मिळवून देण्याचं आश्वासनही देऊ शकतात. खासदार महुआ मोईत्रा आणि सत्यपाल मलिक यांनी राम मंदिराच्या उद्घाटनावेळी दंगली उसळतील असंही म्हटलं आहे. थोडक्यात सत्तेसाठी काहीही करण्याची यांची तयारी आहे. पण, सबका साथ सबका विकास झाला की प्रत्यक्षात सबको लाथ, दोस्तोंका विकास होईल, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर केला आहे.

हिंगोली येथील निर्धार सभेत उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिक आणि जनतेशी संवाद साधला. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, बऱ्याच दिवसांनंतर तुमच्या दर्शनाला आलो आहे. या दोन जिल्ह्यांमध्ये वरुणराजाची आणि शंभू महादेवाची कृपा आहे. कोणतीही यात्रा न काढता या दोन जिल्ह्यांवरती शंभू महादेव आपल्या आशीर्वादाचा अभिषेक करतोय. मी त्याला सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो की तुझा हा आशीर्वाद मराठवाड्याच्याच नव्हे तर माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दे. कारण, सरकार कसंही असो पण जो बळीराजा आहे, शेतकरी आहे, तो माझा आहे. त्यावर कुठलीही अवकृपा होऊ देऊ नको. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम कर, तुझ्या आशीर्वादाच्या या जलधारा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर अशाच बरसत ठेव. काहीजणांना अशी अपेक्षा असेल की मी गद्दारांवर बोलेन पण मी त्यांच्यावर वेळ घालवणार नाही. गद्दारांचा समाचार घ्यायला तुम्ही समर्थ आहात. मी इथे आलोय, ते तुमच्यासाठी आलोय, गद्दारांसाठी आलेलो नाही. गद्दार अनेक झाले पण हिंगोली कायम शिवसेनाप्रमुखांच्या, हिंदुत्ववादी विचारांच्या, भगव्याच्या मागे उभी राहिली आहे. आता सुद्धा काही गद्दार बेटकुळ्या दाखवताहेत. पण, त्या बेटकुळ्यांमध्ये फक्त हवा आहे, ही ताकद माझ्याकडे आहे. पण, वाईट एकाच गोष्टीचं वाटतं आता श्रावण महिना सुरू आहे, एकेक सण येताहेत, मध्ये नागपंचमी झाली. या गद्दाराला आपण नाग समजून त्यांची पूजा केली पण हा उलटा फिरून डसायला लागला. आता तुम्ही गावातले, शेतातले लोक आहात. पायाखाली उलटा फिरून डसणारा साप आला तर काय करायचं ते तुम्हाला कळतं. अरे बाबा तुला पुंगी वाजवली, दूध पाजलं ते वाया गेलं. नाव हिंदुत्वाचं आणि धंदे सगळे अंबादासनी तुमच्यासमोर ठेवलेलेच आहेत. हे असं सगळं करणारा हिंदू म्हणवून घेऊ शकतो का, हा माझा प्रश्न आहे. याला हिंदूत्व मानायचं का, मटक्याचे अड्डे चालवणाऱ्याला हिंदू मानायचं का, आपल्याच लोकांवर उद्धटपणा करणारा? आपल्याच लोकांवर उद्धटपणा करत करणारा असेल तर याचा उद्धटपणा चिरडून, गाडून टाकावा लागेल. हेच सांगायलाच मी इथे आलो आहे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, बाकी शेतकऱ्यांचे अनेक विषय आहेतच. काही जण आता बाहेरच्या राज्यांतून येताहेत. जणू काही इथे शेतकऱ्यांना वालीच नाही. एकतर त्यांची भाषा, आपली भाषा यात फरक आणि अब आयेगी किसान सरकार… माझ्यासमोर किसान बसलाय. मी मुख्यमंत्री असताना जे जे काही केलं होतं, ते तुमच्यापर्यंत पोहोचलं होतं की नव्हतं. की जर या गद्दारांनी घात केला नसता तर माझ्या शेतकऱ्यांचं भलं मी केलं असतं की नसतं, हे त्या उपऱ्यांना सांगा. आम्हाला उपऱ्या नेत्यांची गरज नाही. हे जर भाजपची सुपारी घेण्याचा प्रयत्न करणार असतील आणि भाजपविरोधातली मतं फोडण्याचा प्रयत्न करणार असाल, तर त्यांना सांगतो की आधी तुमचं घर सांभाळा. कारण तुमच्या घराच्या बुडाला सुरुंग लागलेला आहे. आज शेतकरी हवालदिल आहे आणि सरकार फिरतंय. आपला आज कार्यक्रम असताना पलिकडे एक कार्यक्रम होता. कोणता कार्यक्रम, सरकार आपल्या दारी… बरोबर ना? सरकार आपल्या दारी, थापा मारते लय भारी… हे थापा मारणारं सरकार आहे. थापाच थापा.. पण इथल्या शेतकऱ्याला, मला सांगायलाही लाज वाटते की अतिवृष्टी झाली त्याचे पैसे अजून मिळालेले नाहीत. आता दुष्काळाच्या उंबरठ्यावर आपण आहोत. आता दुष्काळ आहे. किती पेरण्या केल्या तुम्ही… मला कळतंच नाही की शेतकऱ्याचा गुन्हा काय, सरकार बदलल्यानंतर हे अस्मानी संकट समजू शकतो, पण गद्दारांची सुलतानी आलेली आहे. या सुलतानीचं संकट त्याहीपेक्षा मोठं आहे. एका बाजूला कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर आला आहे. जे जे काही शेतकऱ्याच्या हिताचं असेल ते चिरडून टाकायचं हे इथे बसलेले आणि दिल्लीत त्यांचे बसलेले मायबाप करत आले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

राज्य सरकारवरही टीकेचे आसूड ओढताना ते म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकारने मध्यस्थी केली पाहिजे. शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळत असतील तर ते पैसे देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे. पण, त्याच बरोबरीने जो ग्राहक आहे, त्याला वाजवी दरात कांदा देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे. पण, सरकार काय बघायला तयार नाही. मध्ये मी एक बातमी अशी वाचली की निवृत्त सरकारी अधिकाऱ्याने मराठवाड्याच्या शेतकऱ्यांचा सर्वे केला. तेव्हा असं लक्षात आलं की, 1 लाखांहून अधिक शेतकरी नैराश्याच्या गर्तेत आहेत. शेतकरी मेहनत करतोय, पीक आलं तरी पिकाला भाव नाही. दुष्काळ पडला, अतिवृष्टी झाली तर नुकसान भरपाई नाही. हा संपूर्ण निराश झालेला शेतकरी, मराठवाड्यात 1 लाखांहून अधिक आहे. म्हणून त्यांनी एक निष्कर्ष काढला आणि सरकारला सादर केला. हा पेरणीपूर्वीचा सर्वे आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं की प्रत्येक शेतकऱ्याला कोणतीही अट न घालता 25 हजार रुपये रोख रक्कम द्या जेणेकरून ती त्याच्या शेतीसाठी उपयोगाला येईल. अहवाल सादर झाला, पैसे तर मिळाले नाहीच. पण, त्या अधिकाऱ्याला स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागली. हा शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्याच्या नशिबी येणारा भोग आहे. हे असं सरकार असेल तर काय चाटायचंय, डबल इंजिन, ट्रिपल इंजिन सरकार शेतकऱ्यासाठी काय करतंय. ट्रिपल इंजिन सरकार नुसतं हवेत थापांच्या वाफा सोडतंय. सरकार आपल्या दारी, योजना मात्र कागदावरी… विशेष म्हणजे देशभरात बाजारबुणग्यांचा कारभार चालला आहे सरकार म्हणून. मी मागेही एका सभेत बोललो होतो की आम्ही हिंदुत्वावादी आहोत. पण, आमचं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम देणारं आहे. पण भाजपमध्ये जे चाललेलं आहे. जय श्री राम… सगळे त्यांच्यात आता आयाराम. मला दया येते ती भाजपच्या कार्यकर्त्यांची कारण 25-30 वर्षं त्यांच्यासोबत युतीत होतो. अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, त्यांनी कुटुंबाकडे न पाहता पक्ष वाढीसाठी आयुष्य झिजवलं आहे. कधीतरी आपला भगवा फडकेल, भगवा फडकला आणि हे राहिले दांड्यापुरतेच आणि फडकताहेत दुसरेच. काय उपयोग आहे यांचा? अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपचा समाचार घेतला.

आगामी निवडणुकांमध्ये दिल्या जाणाऱ्या संभाव्य आश्वासनांचाही त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, निवडणुका जवळ येताहेत. त्यासाठी दोन गोष्टी होऊ शकतात. एक म्हणजे सध्या चांद्रयान चंद्रावर पोहोचलं आहे. तेव्हा पंतप्रधानांकडून 2030 पर्यंत चंद्रावर घरांचं आश्वासन देण्यात येईल. तुम्ही सगळे साधे आहात. तुम्ही काय विचार कराल की मिळणार नाही हे माहितीये पण हे म्हणताहेत देईन, आपण मत दिलं आणि घर मिळालं तर.. पण, प्रत्यक्षात चंद्रावर घर राहिलं दूर शेतातलं राहतं घर गहाण टाकावं लागू शकतं. दुसरं म्हणजे, पश्चिम बंगालच्या खासदार महुआ मोईत्रा आणि कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आपलं मत मांडलं आहे. मलिक यांनी उघडपणे पुलवामाची घटना कारस्थान होतं, ते निवडणुका जिंकण्यासाठी केल्याचं सांगितलं आहे. त्यांनी वर्तवलेली दुसरी शक्यता तमाम हिंदू आणि देशवासीयांनी लक्षात घेतली पाहिजे. ती म्हणजे, पाकिस्तानवरचा हल्ला हे ढोंग होतं हे कळलं, चंद्रावरती घर हे लोक सांगू शकतात. पण, त्याहून भयानक की आता यांनी काहीही न करता जे राम मंदिर उभारलं जातंय, तो सोहळा 1 जानेवारीला ठरतोय. त्यावेळी आपल्याला लक्ष ठेवण्याची गरज आहे. हे मोईत्रा आणि मलिक यांनी सांगितलं आहे, राम मंदिरावेळी देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो, लाखो हिंदूंना बोलवतील. बसेस आणतील, ट्रेन्स आणतील आणि सोहळ्यानंतर परत जाताना मुस्लीम वस्तीत दगडफेक करून देशात दंगली पेटवल्या जातील, हे त्या दोघांचं मत आहे. मग पुन्हा आपलं तेच होणार, पुन्हा धार्मिक वाद पेटवून हे सत्तेवर बसणार, पुन्हा आपल्या घरादारावर वरंवटा फिरणार. मग सबका साथ सबका विकास झाल्यावर सबको लाथ, दोस्तोंका विकास होणार… या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.