पाण्याचा अपव्यय; नियोजनाअभावी उजनी तळ गाठणार

सोलापूरसह तीन जिह्यांची वरदायिनी असलेले उजनी धरण यंदा नीचांकी पातळीवर पोहोचले असून, आजमितीस उजनी धरणात उणे 36 टक्के पाणीसाठा आहे. धरणाच्या या स्थितीला नियोजनाचा अभाव आणि पाण्याचा अपव्यय कारणीभूत ठरला असून, अवघ्या दोन महिन्यांत उजनी तळ गाठेल, असे भाकीत वर्तविण्यात येत आहे. उजनीतील नीचांकी पातळीमुळे शेतकऱयांची हातातोंडाशी आलेली पिकेही करपून जाणार आहेत.

सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना सोलापूर, नगर आणि धाराशिव जिह्यांवर दुष्काळाची भयंकर छाया पसरली आहे. उजनी धरणात आजमितीस केवळ उणे 36 टक्के पाणीसाठा असून, येत्या चार ते पाच दिवसांत उणे 40 टक्क्यांच्या पुढे पोहोचणार आहे. त्यामुळे या जलाशयावरील पाणीपुरवठा करणाऱया अनेक योजना बंद पडणार आहेत. या भीषण स्थितीला तोंड देण्यासाठी अनेक शहरात सध्या पूर्वीपेक्षा एक दिवस अधिक वाढवून पाणीपुरवठा केला जात आहे.

सोलापूर शहराचा येत्या महिनाभराचा पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी मे महिन्याच्या मध्यावर उजनी धरणातून पाणी सोडावे लागणार आहे. बंधारे फोडणे, पाण्याची चोरी यासारख्या घटना होत असून, उजनी धरणातील पाण्याची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी उजनी धरणाच्या इतिहासातील नीचांकी पातळी गाठली जाणार आहे.

सन 2015 साली उजनी धरणाने उणे 60 टक्के इतकी नीचांकी पातळी गाठली होती. यंदाच्या वर्षी हा रेकॉर्ड मोडत 70 टक्क्यांपर्यंत पाणीपातळी कमी होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. अशातच यंदाचा उन्हाळा अत्यंत तीक्र असून, पाण्याचा उपसाही वाढल्याने उजनीतील पाणीपातळी झपाटय़ाने कमी होत आहे. धरणातील पाण्याचे बाष्पीभवन आणि शेतीसाठी उपशामुळे दररोज 425 कोटी लिटर पाणी कमी होत आहे. त्यामुळे उजनी धरण इतिहासातील नीचांकी पातळीला पोहोचणार हे नक्की!

भ्रष्ट कारभार व पाण्याचा अपव्यय

यंदाच्या उजनीच्या भीषण स्थितीला राजकारणी, लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन व उजनी प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. उन्हाळ्यापूर्वी पाण्याचे नियोजन न करता 80 ते 82 टीएमसी पाणी सोडून देण्यात आले. 11 मार्च रोजी उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले. 10 दिवसांत 6 टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन असताना तब्बल 13 दिवस पाणी सोडण्यात आले, यात दीडपट पाणी म्हणजे 9 टीएमसी पाणी जास्त सोडण्यात आले आहे. या भ्रष्ट नियोजनात अधिकारी, राजकारणी व भीमा नदीकाठच्या शेतकऱयांची मिलीभगत असल्याचे दिसून येत असून, अर्थपूर्ण कारभारामुळे पाण्याचा अपव्यय झाल्याची चर्चा आहे. सध्या उजनीचे नियोजन म्हणजे ‘तू कपाने पी, मी पितो बशीने’ अशी अवस्था झाली असून, 25 टीएमसी गाळ असलेल्या उजनीत अवघे 20 टीएमसी पाण्याचा थर आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत सोलापूरसह तीनही जिह्यांत पाण्याचे भीषण दुर्भिक्ष्य जाणवणार असून, शेतीबरोबरच पिण्याचा पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याशिवाय राहणार नाही.

हिळ्ळी बंधारा फोडला

n अक्कलकोट तालुक्यातील हिळ्ळी येथील भीमा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. यावर अनेक पाणीपुरवठा योजना अवलंबून असून, उजनीतील सोडलेल्या पाण्याने बंधारा भरून घेण्यात आला होता. दरम्यान, कर्नाटकातील या नदीकाठच्या काही लोकांनी बंधाऱयावरील प्लेट फोडल्या, त्यामुळे कर्नाटक हद्दीत मोठय़ा प्रमाणावर पाणी सोडून देण्यात आले. या घटनेची अद्यापही पाटबंधारे विभागाचे अधिकारी व जिल्हा प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे तीक्र संताप व्यक्त होत आहे.