Unacademy Teacher – शिकलेल्या उमेदवारांना मत द्या म्हणणाऱ्या शिक्षकाला काढून टाकले

शिक्षणतंत्रज्ञान कंपनी असलेल्या अनअकॅडमीने (Unacademy ) करण सांगवान नावाच्या शिक्षकाला कामावरून काढून टाकले आहे. करण सांगवान यांनी वर्गात शिकवत असताना सुशिक्षित उमेदवारांना मतदान करा असं विद्यार्थ्यांना आवाहन केले होते. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे त्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे.

करण सांगवान यांना अशाप्रकारे हटवल्याने खळबळ उडाली असून या मुद्दाचे भांडवल करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. स्पष्टीकरण देताना अनअकॅडमीने सांगितले की, करण यांनी कराराचे उल्लंघन केले असल्याने त्यांना हे पाऊल उचलावे लागले.

नोकरीवरून काढून टाकल्यानंतर करणने त्याच्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ अपलोड केला असून यात त्यांनी 19 ऑगस्ट रोजीच्या व्हिडीओमध्ये त्यांना नोकरीवरून का काढलं याची सगळी प्रकरणाची माहिती देणार असल्याचे सांगितले आहे

केंद्र सरकारने ब्रिटीश काळात बनवलेल्या IPC-CrPC मध्ये सुधारणा करणारी विधेयके मांडली आहे. ही विधेयके संसदीय समितीकडे पुनरावलोकनासाठी पाठवण्यात आली आहेत. करण सांगवान हे कायदा विषय शिकवत होते. IPC-CrPC मध्ये सुधारणा करणारी विधेयकांनुळे सांगवान नाराज झाले होते. यामुळे त्यांनी वर्गातील विद्यार्थ्यांना सुशिक्षित उमेदवारांना मतदान करा असं सांगितलं होतं. हा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

करण यांनी म्हटले आहे की, ‘एक गोष्ट लक्षात ठेवा. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमचे मत द्याल तेव्हा तुमचे एखाद्या सुशिक्षित व्यक्तीला द्या. जेणेकरून तुम्हाला आयुष्यात या सगळ्याचा सामना पुन्हा करावा लागणार नाही. तुम्ही अशा व्यक्तीची निवड करा जी शिक्षित आहे, ज्याला गोष्टी समजू शकतात. ज्याला गोष्टी बदलणं किंवा नावे बदलणे एवढंच ठावूक आहे अशा व्यक्तीला मत देऊ नका. आपला निर्णय योग्यरितीने घ्या. करण सांगवान यांनी म्हटलंय की सरकार ना वेळेवर भरती करते, ना रोजगाराची व्यवस्था करते. कोणी प्रश्न विचारला तर त्या व्यक्तीवर दबाव टाकून त्रास दिला जातो. कोणताही प्रश्न उपस्थित केल्यास अशा प्रकारे दबाव निर्माण करून त्रास दिला जातो. शिक्षकांचे हे दुर्दैव आहे की त्यांना हा अपमान सहन करावा लागत आहे.