हत्तीची विनापरवाना वाहतूक; संस्थेवर गुन्हा

मिरज तालुक्यातील नांद्रे येथे धार्मिक कार्यक्रमासाठी विनापरवाना हत्तीची वाहतूक केल्याप्रकरणी शेडबाळ (ता. कागवाड, जि. बेळगाव) येथील संस्थेवर वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला.

श्री शांतीसागर दिगंबर जैन क्षेत्राश्रम यांच्यावर गुन्हा नोंद झाल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.

हत्ती हा शेडय़ुल एकमधील वन्यजीव आहे. परराज्य किंवा जिह्यात अन्यत्र कोठेही हत्तीला नेण्यासाठी वाहतूक परवान्याची गरज असते. त्या परवानगीशिवाय नेणे कायद्याने गुन्हा आहे. शेडबाळ येथील क्षेत्राश्रमाचा हत्ती नांद्रे येथे काल धार्मिक कार्यक्रमासाठी नेण्यात आल्याची माहिती वनविभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार उपवनसंरक्षक नीता कट्टे, सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे यांच्या नेतृत्वाखाली वनक्षेत्रपाल महांतेश बगले यांच्या पथकाने माधवनगर जकात नाका येथे सापळा रचला.

त्यावेळी ट्रकमधून हत्तीची वाहतूक होताना दिसून आली. याबाबत वाहतुकीची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे दिसून आले. त्यानुसार हत्तीला काल सायंकाळी वनविभागाने ताब्यात घेतले. आज संबंधितांवर गुन्हा नोंद करण्यात आला. वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. कारवाईत वनपाल राजाराम तिवडे, अजितकुमार दगडे, मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील, सचिन साळुंखे यांचा सहभाग होता.