Chandrayaan 3- यान पृथ्वीवर उतरले, सगळ्यांनी स्वागत करायला हवे, योगींच्या मंत्र्यांचे विधान

इस्त्रोने चंद्रावर पाठवलेले यान बुधवारी संध्याकाळी कोणत्याही अडचणीशिवाय व्यवस्थित उतरले. आज सकाळी या यानातून ‘प्रज्ञान’ रोव्हर बाहेर पडला असून त्याने फेरफटकाही मारला आहे. संपूर्ण जग हिंदुस्थानच्या शास्त्रज्ञांचे कौतुक करत आहे. कालचा हा ऐतिहासिक क्षण प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकासाठी आनंदाचा क्षण होता. योगी आदित्यनाथ यांचे मंत्री ओपी राजभर यांनाही या घटनेचा आनंद झाला होता. त्यांनीही वैज्ञानिकांना शुभेच्छा दिल्या. मात्र त्यांनी शुभेच्छा दिल्या ते चंद्रयान चंद्रावर नाही तर पृथ्वीवर उतरल्याबद्दल.


राजभर यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला मंगळवारी प्रतिक्रिया दिली होती. ज्यात ते म्हटले होते की “सर्वप्रथम, मी भारतातील त्या वैज्ञानिकांचे आभार मानतो जे दिवसेंदिवस संशोधन करून नवनवीन शोध लावत आहेत. चांद्रयान 3 साठी आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. चांद्रयान 3 उद्या जेव्हा सुरक्षितपणे पृथ्वीवर उतरेल तेव्हा संपूर्ण देशाने त्याचे स्वागत केले पाहिजे. राजभर यांनी चंद्राऐवजी पृथ्वीवर यानाचे लँडींग केल्याने त्यांची खिल्ली उडवली जात आहे.

अजित पवार म्हणतात ‘चंद्रकांत यान’

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हिंदुस्थानी शास्त्रज्ञांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी लिहून आणलेला संदेश वाचून दाखवताना चूक केली. त्यांनी चंद्रयान असं म्हणायच्या ऐवजी चंद्रकांत यान असे म्हटले.

इस्रोने इतिहास रचला!!

हिंदुस्थानचा तिरंगा दिमाखात चंद्रावर फडकला आहे. अवघ्या 41 दिवसांत इस्रोने चांद्रयान-3 मोहीम फत्ते करत इतिहास रचला आहे. ठरलेल्या मुहूर्तावर आज सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर निर्विघ्नपणे उतरले आणि अवघ्या हिंदुस्थानात ‘चंद्रोत्सव’ साजरा झाला… चंद्रदर्शनाने अवघे आसमंत प्रकाशले… तारकादळे आनंदली… चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ठसा उमटवणारा हिंदुस्थान हा आता जगातील पहिलाच देश ठरला असून या अभूतपूर्व कामगिरीसाठी ‘टीम चांद्रयान’वर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

हिंदुस्थानसाठी हा अविस्मरणीय आणि ऐतिहासिक असा क्षण आहे. हिंदुस्थानच्या जयघोषाचा, शंखनाद करण्याचा हा दिवस आहे. समस्यांचा महासागर ओलांडून आपण इथपर्यंत आलो आहोत. 140 कोटी जनतेचं स्वप्न आज पूर्ण झालं. हा अद्भुत क्षण आमच्या आयुष्यात आणणाऱ्या टीम चांद्रयानचे मी अभिनंदन करतो, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या. नवा इतिहास रचला जाताच अवघा देश जल्लोष करत आहे. घरोघरी उत्सवाचे वातावरण आहे, असेही मोदी म्हणाले.

अभिमानाचा क्षण

‘देशासाठी हा अभिमानाचा क्षण आहे’, असे गौरवोद्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले. हिंदुस्थानने चंद्रावर पाऊल ठेवून इतिहास घडवला. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अथक परिश्रम घेणाऱ्या आणि संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांचे हे यश आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. इस्रोच्या वैज्ञानिकांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. देशासाठी हा अभिमानाचा क्षण आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांची स्तुती केली.