सृजन संवाद – अनुभूतीचा स्पर्श

>> वंदना ताम्हाणे

जो आसपास असतो, आपल्याभोवती नाही तर आपल्यातच. देवाने दिलेल्या स्पर्शाच्या ज्ञानापलीकडचा स्पर्श…अनुभव देहाला होतो, पण अनुभूती आत्म्याला होते. या अनुभूतीत इतकी प्रचंड ताकद असते की, ती कोणत्याही अणूतही नसावी. हा स्पर्श संतांना झाला. जो त्यांच्या रोमरोमांतून जाणवला. एक रंध्र असे नसावे जिथे भगवंताचा स्पर्श नसावा. चोखामेळय़ाची तर हाडेही विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. कारण हाडांनाही स्पर्श नामाचा.

शबरीच्या बोरात, हनुमंताच्या हृदयात, मीरा, कुब्जा, विदूर, उद्धव, राधेच्या प्रेमात, श्रीकृष्णाच्या बासरीत, सावत्याच्या मळय़ात, गोरा कुंभाराच्या मातीत, जनाईच्या दळणकांडणात, नामदेवांच्या भक्तीत, एकनाथांच्या भारूडात, रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांत, दासबोधात, ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीत, एकनाथी भागवतात, तुकारामांच्या गाथेत, विठ्ठलाच्या नामात, माऊलीच्या पायी वारीत कुठे नाही हा स्पर्श. सर्व जगतात. ब्रम्हाडांत व्यापलेला. अणूपासून रेणूपर्यंत, आभाळापासून जमिनीपर्यंत, श्वासापासून उच्छ्वासापर्यंत, जीवनापासून मृत्यूपर्यंत अनंतात.

सर्व संतांना भगवंताचा चरणस्पर्श. पावन ही संत वंशवेल, अमृतवेल…या वेलीला फळं लगडली शब्दांची…परब्रम्हाची आणि या शब्दांना मी चरणस्पर्श करते. मी म्हणजे एकात अनेकत्व. हे अनेकत्व एकात मिसळून जाते. तल्लीन होते. लीन होते. अभंगांना, भजनाला, नामाला स्पर्श होतो. बंद डोळय़ांनी आणि ही अनुभूती अंगभर पसरते. रक्तप्रवाहासारखी अख्ख्या शरीरात.

दिव्य या शब्दाला प्रतिशब्द नाही. ही अनुभूती भगवंताची संतांना प्राप्त होऊन भक्तात परावर्तित झाली. देव आणि भक्ताचा स्पर्श एक दृश्य व एक अदृश्यमध्ये फक्त लहरी. स्पर्श न करता स्पर्श होणे म्हणजे अनुभूती. देव व भक्तातली दिव्य अनुभूती. जी इतर कोणत्याही स्पर्शात नाही. अशा संत चरण पदस्पर्श अनुभूतीने संपूर्ण चराचराचा भास नाही, तर चराचरच सामावून जाते. ज्याला भगवंताचा चरणस्पर्श होतो, तो स्पर्शापलीकडे पोहोचतो. ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये सर्वांचा लोप होऊन उरते ती केवळ अनुभूती.

भक्ती, श्रद्धा, प्रेम या त्रिसूत्रीचा मंत्रोच्चार होऊन तपस्या झाली की, हा स्पर्श होतो. कल्याणकारी स्पर्श. सुखाचा स्पर्श, सुख-दु:ख एकाच पंक्तीत दास होऊन उभे राहते.

अप्रत्यक्ष असा हा स्पर्श श्रेष्ठ स्पर्श. संत चरणावर व भगवंताच्या मूर्तीच्या चरणावर ठेवलेल्या मस्तकाला, हातांना झालेला स्पर्श भिन्न नाहीच. जो प्रत्येकाला जाणवतो. हेच ते एकात अनेकत्व व अनेकात्वात एकत्व. या स्पर्शाची अनुभूती फक्त भक्त व देव या द्वैतातल्या अद्वैतालाच होते. शरीर आणि आत्मा एकाच पातळीवर येऊन पवित्र होतात, दोहोत भेदभाव असा राहत नाही. हा जिवा-शिवाचा स्पर्श.

[email protected]