‘विकसित भारत के लिए अग्रेसर गुजरात’; पुन्हा सवाल, मोदी देशाचे की गुजरातचे पंतप्रधान

सुरतमधील डायमंड बोर्सच्या उद्घाटनादरम्यान गुजरातची प्रगती झाली तर देशाची प्रगती होईल असे वक्तव्य करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता व्हायब्रंट गुजरातवर 20 रुपयांचे नाणे आणणार आहेत. विशेष म्हणजे या नाण्यावर ‘विकसित भारत के लिए अग्रेसर गुजरात’ असे लिहीण्यात येणार आहे. त्यामुळे मोदी हे नक्की देशाचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे, असा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.

2047 मध्ये विकसित भारताच्या उद्देशाने ‘गेटवे टू द फ्युचर’ या थीमवर गांधीनगरमध्ये 10 जानेवारीपासून व्हायब्रंट गुजरात शिखर परिषद सुरू होत आहे. व्हायब्रंट गुजरातला 20 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केंद्र सरकार 20 रुपयांचे नाणे जारी करणार असून त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. या शिखर परिषदेत 4 देशांचे राष्ट्रप्रमुख, 18 देशांचे राज्यपाल आणि मंत्री, 14 देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

टेस्लाही गुजरातमध्ये, अनेक कंपन्यांची गुंतवणूक

महाराष्ट्रातील हिरे व्यापार मिंधे सरकारच्या डोळय़ादेखत गुजरातमध्ये पळवण्यात आला. त्यामुळो मुंबईतील लाखो लोकांचा रोजगार बुडाला. आता टेस्ला महाराष्ट्रऐवजी गुजरातमध्येच जाणार असून मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक करून गुजरातची भरभराट करण्याचा मोदी सरकारचा डाव असल्याचे समोर आले. टेस्ला गुजरातमध्ये उभारण्यासाठी उच्चस्तरीय स्तरावर चर्चा सुरू असून लवकरच हा प्रकल्प आकाराला येईल, असे गुजरातचे उद्योगमंत्री बलवंतसिंह राजपूत यांनी म्हटले आहे. सेमीकंडक्टर, आयटी आणि इलेक्ट्रॉनिक अशा अनेक क्षेत्रांत मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक करण्यात येणार असून त्या दृष्टीने मोठे धोरण आखण्यात आल्याची माहिती गुजरातच्या उद्योग आणि खाण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव एस. जे. हैदर यांनी म्हटले आहे.

कसे असेल नाणे?

35 ग्रॅमच्या या नाण्यामध्ये 50 टक्के चांदी, 40 टक्के तांबे, 5 टक्के निकेल आणि 5 टक्के जस्त असेल. नाण्याच्या दोन्ही बाजूस अशोकाचे चिन्ह, सत्यमेव जयते, रुपयाचे चिन्ह आणि मागच्या बाजूला हिंदुस्थान आणि व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट 2024 चा लोगो असेल. यासोबतच 20 रुपयांचे पोस्टल स्टॅम्पही जारी करण्यात येणार आहे.