विक्रमगडला अवकाळी पावसाने झोडपल; आंबा बागायतदारांना फटका

विक्रमगड तालुक्याला आज अवकाळी पावसाने झोडपले. दोन तास पाऊस झाला. सकाळी ढगाळ वातावरण तयार झाले आणि तासाभरात पावसाला सुरुवात झाली. वाढत्या उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला असला तरी अवकाळीचा सर्वाधिक फटका आंबा बागायतदारांना बसला आहे. पावसामुळे पैऱयांचा सडा झाडाखाली पडल्याचे चित्र अनेक ठिकाणी होते.

दरवर्षी निसर्गाचा वाढत चालेला लहरीपणा त्याचबरोबर लांबत असलेला पाऊस, अवकाळी पाऊस व त्यामुळे वातावरणात होणारा बदल याचा परिणाम पिकांवर मोठय़ा प्रमाणावर होताना दिसत आहे. विक्रमगड तालुका व परिसरात 183 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात आंबा बागायती आहेत. थंडीमुळे यंदा आंब्यांच्या झाडांना उशिरा का होईना मोहर आला व त्यातच आता आंबा फळ तयार होऊ लागले असताना अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरण राहिले. आंबा पिकाचे नुकसान होण्याची भीती आंबा उत्पादक शेतकऱयांना सतावत होती. आज पाऊस झाला आणि याचा फटका आंबा झाडांना बसला. अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार अडचणीत सापडला आहे.

उरण ः उकाडय़ाने घामाघूम झालेल्या उरणवासीयांना सकाळीच काही मिनिटांसाठी झालेल्या पावसाच्या शिडकाव्याने गारवा मिळाला.