बिल्डर विशाल अगरवाल याच्यासह तिघांना पोलीस कोठडी

कल्याणीनगर अपघात प्रकरणात बिल्डर विशाल अगरवाल याच्यासह तिघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी 24 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. रविवारी मध्यरात्री भरधाव मोटारीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुणासह त्याची मैत्रीण मृत्युमुखी पडली. दरम्यान, अल्पवयीन मुलाला पब कर्मचार्‍यांनी मद्य उपलब्ध करून दिले, तर वडिलांनी मुलाला मोटार चालवायला दिल्याप्रकरणी पोलिसांनी विशाल अगरवाल याला अटक केली होती.

विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल (वय 50, रा. ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी), ब्लॅक पबचा कर्मचारी नितेश धनेश शेवानी (वय 34, रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा) आणि जयेश सतीश गावकर (वय 23, रा. केशवनगर, मुंढवा) यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सर्वांना 24 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

अपघात घडल्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलगा चालवत असलेल्या मोटारातील चालकाचा जबाब नोंदवला आहे. मुलाने जर गाडी चालवायला मागितली तर त्याला गाडी दे आणि तू बाजूला बस, अशी सूचना विशाल अगरवाल यांनी चालकाला दिली होती. अल्पवयीन मुलगा ज्या हॉटेल, पबमध्ये पार्टीसाठी जाणार आहे, त्या हॉटेल आणि पबममध्ये मद्य मिळते, याची माहीती अगरवाल यांना होती. त्यांनी त्याला मुलाला पार्टीला जाण्यास परवानगी दिली. पार्टीसाठी जाताना त्याला पैसे दिले होते का?, पार्टीसाठी अल्पवयीन मुलाला नेमके किती पैसे दिले होते किंवा क्रेडीटकार्ड दिले होते काय? अल्पवयीन मुलासोबत पार्टीसाठी आणखी कोण होते? याबाबत आरोपीकडे सखोल तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकील विद्या विभूते आणि योगेश कदम यांनी केला.

पबचा कर्मचारी गावकर आणि शेवानी यांनी आरोपी अल्पवयीन आहे की नाही, याची खातरजमा न करता त्यांना मद्यपान करण्याची परवानगी दिली, असे अ‍ॅड. विभुते यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. आरोपींच्या वतीने अ‍ॅड. सुधीर शहा, अ‍ॅड. अमोल डांगे, अ‍ॅड. प्रशांत पाटील यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवादानंतर न्यायालयाने अगरवाल, शेवानी, गावकर यांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.