मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजेत… प्रसाद गोखले यांची फेसबुक समूहाच्या माध्यमातून चळवळ

>> अनघा सावंत

बोरिवली येथील प्रसाद गोखले यांनी 2014 मध्ये ‘मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजेत’ या आगळय़ावेगळय़ा फेसबुक समूहाची स्थापना केली. मराठी शाळा पर्यायाने मराठी भाषा टिकावी म्हणून त्यांनी हाती घेतलेली ही एक चळवळच म्हणावी लागेल. आजघडीला या समूहाची सदस्य संख्या एक लाख पंधरा हजार झाली आहे.

मातृभाषेतील शिक्षण हे नेहमीच मुलाची उत्तम मानसिक जडणघडण होण्यासाठी कारणीभूत ठरते. सद्यस्थितीत जनमानसात जागतिकीकरणाच्या रेटय़ात इंग्रजी भाषेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य मराठी माणूसही आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यासाठी आग्रही असतो, मग तो सुशिक्षित असो वा अशिक्षित. आताची किंवा पुढची पिढी जर इंग्रजी माध्यमातूनच शिकली तर मग माय मराठी भाषा टिकणार कशी? याच तळमळीतून प्रसाद गोखले यांनी या फेसबुक समूहाची निर्मिती केली.

मध्य रेल्वेत कामाला असलेल्या गोखले यांनी 2014 मध्ये आपल्या मुलाला बोरिवलीतीलच एका अनुदानित मराठी शाळेत बालवर्गात प्रवेश घेतला. यामुळे लोक काय म्हणतील? मुलाचे नुकसान होईल का? पुढे मुलगाच आपल्याला विचारेल की, मला मराठी शाळेत का घातले? अशा काल्पनिक गोष्टीचे त्यांना दडपण आले. तरी मुलांचे शालेय शिक्षण हे मातृभाषेतूनच झाले पाहिजे याविषयी त्यांच्या मनात कसलीही शंका नव्हती.

या समूहाच्या स्थापनेविषयी ते म्हणाले, माझ्या मुलाला मराठी शाळेत प्रवेश घेतल्यावर मी मातृभाषेतून शालेय शिक्षणाचे महत्त्व आणि इंग्रजी माध्यमात होणारी लहान मुलांची ओढाताण, घुसमट तसेच पालकांची तिथे होणारी पिळवणूक, लूट तसेच या विषयातील सर्व बारीक-सारीक मुद्दे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फेसबुकवर या समूहाची स्थापना केली. सुरुवातीची वाटचाल अजिबात सोपी नव्हती. कुणीही उघडपणे बोलायला तयार नव्हते. अनेक वेळा तर टिंगलटवाळी आणि टीका सहन करावी लागली. आता मात्र सातत्याने मराठी शाळांचा विषय मांडणारा समाज माध्यमावरील सर्वात मोठा समूह ठरला आहे. महाराष्ट्र शासनाने मराठी शाळांच्या मागे कणखर भूमिका घेत उभे राहिले पाहिजे ही लाखो पालकांची अपेक्षा आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

राजकारण, धर्म, जातपात आणि इतर अनावश्यक गोष्टींना अजिबात थारा न देता मातृभाषेतून शालेय शिक्षणाचा विषय अधिकाधिक पालकांपर्यंत पोहोचविण्याचे काम समूह करत आहे. अनेक तरुण पालक आज या विषयावर सकारात्मक विचार करून मुलांना मराठी शाळेत प्रवेश घेत आहेत याचे समाधान आहे, असे गोखले यांनी सांगितले.