देशभरात 13 दिवसांत आचारसंहितेच्या 79 हजार तक्रारी

केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 मार्चला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केल्यापासून आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र आचारसंहिता लागू झाल्यापासून गेल्या 13 दिवसांत देशभरात आचारसंहिता उल्लंघनाच्या 79 हजार तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींपैकी 99 टक्के तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली.

केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 मार्चला देशभरातील लोकसभेची निवडणूक सात टप्प्यांमध्ये होणार असल्याची घोषणा केली. पहिल्या टप्प्यातील मतदानाला 19 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. मतदानाचा सातवा टप्पा 1 जूनपर्यंत चालणार आहे. 4 जूनला देशभरातील निकाल जाहीर होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून आचारसंहिता उल्लंघनाच्या प्रकारामध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला सिव्हीजील अॅपद्वारे 79 हजारहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी 99 टक्क्यांहून अधिक तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने सिव्हीजील हे मोबाईल ऑप्लिकेशन तयार केले आहे. या अॅपवर नागरिकांना आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारी करता येतात. हे अॅप निवडणूक पर्यवेक्षण आणि प्रचारातील गोंधळ कमी करण्यासाठी एक प्रभावी साधन बनले आहे.

बेकायदेशीर बॅनर, होर्डिंग    – 58 हजार 500

पैसे, भेटवस्तू, दारूचे वाटप  – 1 हजार 400

मालमत्तेचे नुकसान  – तीन टक्के तक्रारी

गुंडगिरी – 535 तक्रारी

आचारसंहितेनंतर प्रचार – एक हजार

बंदुकांचे प्रदर्शन, धमकावणे – 535