निसर्ग मैत्र – औषधी खैर

>> अभय मिरजकर

पान खात असताना जो कात वापरला जातो, तो ज्या वृक्षापासून मिळतो तो वृक्ष म्हणजे खैर किंवा खदिर होय. खैराला वाळवी लागत नाही. त्यामुळे लाकडाच्या जोडणीसाठी विशेष म्हणून खैराचा वापर केला जात असे. त्यामुळेच ‘खैराची खुट्टी’ हा शब्दप्रयोग रूढ झाला असावा. अनेक उपयोग असणारा हा वृक्ष आहे. खैर मृग नक्षत्राचा आराध्य वृक्ष मानला जातो. खैराची झाडे खूप मजबूत असतात. त्याचे देठ हाडांसारखे कडक असतात. खैर झाड 9 ते 15 मीटर उंच वाढते. खैर हे काटेरी झाड असून त्याचे आयुष्य दीर्घ असते. काही जुन्या झाडांच्या खोडाच्या आतल्या भेगांमध्ये कधी काळे, तर कधी पांढरे पदार्थ रवा किंवा खदिरा पावडरच्या स्वरूपात आढळतात. त्याला खैर (खदिर) असेदेखील म्हणतात.

खैर लाकूड मुख्यत पूजेसाठी वापरले जाते. यज्ञ-हवन इत्यादींच्या समिधामध्ये वापरल्या जाणाऱया नवग्रहांच्या लाकडांपैकी हे एक आहे. खैराचे लाकूड कठीण आणि टिकाऊ असते. आशिया खंडातील हिंदुस्थान, चीन, पाकिस्तान, ब्रह्मदेश इत्यादी ठिकाणी खैर आढळून येतो. या झाडाला राखाडी-तपकिरी किंवा गडद तपकिरी साल असते आणि त्याचा देठ सहसा जांभळा किंवा तपकिरी रंगाचा असतो. त्याला एकापेक्षा जास्त पाने स्टेमशी जोडलेली असतात आणि प्रत्येक पानाला सुमारे 30 जोडय़ा असतात. ते आकारात तिरकस असून त्याच्या पृष्ठभागावर बारीक काटे असू शकतात. खदिर फुलांचा आकार 5 ते 10 सेमी आणि पिवळा किंवा हिरवा-पिवळा रंग असतो. खैर याचे शास्त्राrय नाव अकॅशिया कॅटिचू आहे. याला ब्लॅक कॅटिचू, मिमोसा कॅटिचू, तर संस्कृतमध्ये खदिर म्हणतात.

याचा उपयोग लाकडी खांब, हत्यारे-अवजारे, बासरी, होडय़ा इत्यादी वस्तू बनवण्यासाठी होतो. खैर चवीला तिखट आणि तुरट तसेच थंड असते. त्यात भूक वाढवण्याचे आणि अन्न सहज पचवण्याचे गुणधर्म आहेत. आयुर्वेदीय औषधांमध्ये मुखविकार, डायरिया यावर औषध म्हणून कात वापरतात. तसेच तोंडाला चव आणण्यासाठी पचनक्रिया सुधारण्यासाठी व दाताचे आरोग्य सुधारण्यासाठी, तसेच त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी काताचा वापर करतात. कात कफ कमी करून गळा साफ करतो.

खैराचे लाल खैर, सोनखैर असे इतर प्रकार आहेत. कुष्ठरोग, एक्जिमा इत्यादी त्वचेच्या आजारांसाठी खैर किंवा खदिर हे एक चांगले औषध आहे. हे पित्ताशय आणि दात मजबूत करते. यामुळे पोटदुखीपासून आराम मिळतो. खैर ही औषधी वनस्पती विशेषत घसा खवखवणे आणि त्वचेशी संबंधित समस्यांवर अधिक प्रभावी मानली जाते. खैरच्या पानांमध्ये

आण्टिऑक्सिडंट आणि आण्टिमाइाढाsबियल संयुगे असतात, ज्याला टॅक्सीफोलिन म्हणतात. खैरचे आण्टिडायबेटिक गुणधर्म: फ्लेव्होनॉइड्स, टेरपेनोइड्स, ग्लायकोसाइड्स हायड्रोक्लोरिक अर्क रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी प्रभावी आहे. याची साल तोंड आणि ओठांची जळजळ तसेच साप चावण्याच्या उपचारांसाठी वापरली जाते. हे जखमांवरदेखील वापरले जाते. खैराचे लाकूड गरम पाण्यात उकळून याचा वापर महिलांमध्ये प्रसुतिपश्चात वेदना कमी करण्यासाठी केला जातो.