Lok Sabha Election 2024 …तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू, अजित पवार गटाचा इशारा

महायुतीत सध्या जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यात मिंधे गटाचे विजय शिवतारे हे बारामती मतदारसंघावर अडून बसले आहेत. त्यांनी थेट बंडाचा पवित्रा घेतला असून 12 एप्रिलला ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत. दरम्यान रविवारी शिवतारे यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर टीका केली.

शिवतारे यांच्या टीकेला उत्तर देताना मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी थेट महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना उमेश पाटील म्हणाले की, शिवतारे यांनी आमचे नेते अजित पवार यांच्यावर अश्लाघ्य शब्दात टीका केली आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी आम्ही मागणी करत आहोत. त्यांची हकालपट्टी करा ही आमची मागणी आहे. जर एकनाथ शिंदे यांनी आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले तर आम्हाला महायुतीतून बाहेर पडावे लागेल. दुसरा काही पर्याय आमच्याकडे उरणार नाही, असे उमेश पाटील म्हणाले.

विजय शिवतारे ज्या प्रकारे टीका करत सुटले आहे ते सहन करण्याच्या पलिकडे आहे. आता त्यामुळे महायुतीत राहायचे की नाही याचा आम्ही गंभीरपणे विचार करत आहोत. आमच्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह टीका आणखी सहन केली जाणार नाही. शिवतारे यांच्या भूमिकेमुळे राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये दुरावीा येत आहे, त्यामुळे शिवतारेंची हकालपट्टी करावी, अशी मागणी उमेश पाटील यांनी केली.