निमित्त – मना, नित्य संकल्प जिवी धरावा…

>>अभिजीत पेंढारकर

मावळत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी ठरलेल्या ठिकाणी जमलेलं ‘गप्पाष्टक मित्रमंडळ’ नववर्षाचा संकल्प काय असावा याची चर्चा करता करता संकल्प मागच्या पानावरून पुढे असेच चालू राहणार या मतावर आला, शेवटी पुण्याचा जाज्वल्य अभिमान, शिस्त, खोचकपणा अशा अनेक गोष्टींना कुठलाही संकल्प लागू पडत नाही हेच खरं…

तुम्ही काहीही म्हणा, पण पुणं आता पूर्वीसारखं राहिलं नाही.” नानासाहेबांनी हे वाक्य उच्चारलं आणि सगळं काही नॉर्मल आहे, हे त्यांच्या ‘गप्पाष्टक मित्रमंडळा’च्या लक्षात आलं.

रोज संध्याकाळी सारसबागेत भेटण्याचा गप्पाष्टक मित्रमंडळाचा नेम होता. एकवेळ ‘बासुंदी चहा’वाले चहात साखर घालायला विसरतील, रिक्षावाले ‘कितीही जवळचं अंतर असू दे, चला सोडतो’ असं प्रेमाने म्हणतील, पण गप्पाष्टक मित्रमंडळाची संध्याकाळची बैठक आणि नानासाहेबांचं हे वाक्य, यात कधीच खंड पडणार नाही. तळय़ातल्या गणपतीला प्रदक्षिणा झाली नाही, तर रोजच्या सदस्यांनाच नव्हे, गणरायालाही करमत नाही, असे लोक सांगतात. गप्पाष्टक मित्रमंडळाची स्थापना नक्की कधी झाली, हे आता नानासाहेबांनाही आठवत नाही. पण स्थापनेच्या दिवसापासून रोज सारसबागेतल्या फेरीचा नेम चुकलेला नाही, हे मात्र त्यांच्या पक्के लक्षात आहे. पन्नाशी उलटून गेलेले आणि साठीच्या जवळपास असलेले हे सगळे मित्र. गेल्या अनेक वर्षांची त्यांची मैत्री. संध्याकाळचा मोकळा वेळ, फिरण्याची, भेटण्याची आणि मुख्य म्हणजे गप्पांची हौस, त्यामुळे रोज एकत्र जमायला लागले. त्यांच्या गप्पा आणि सातमजली हसू बघून लोकांनीच त्यांच्या ग्रुपचं ‘गप्पाष्टक मित्रमंडळ’ असं बारसं केलं आणि तेच नाव पुढे त्यांना चिकटलं. रोजच्याप्रमाणे आजही ठरलेल्या वेळी, मावळत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी सगळी मंडळी ठरलेल्या ठिकाणी जमली होती.

“असा काय विशेष बदल जाणवला तुम्हाला पुण्यात?” दिनूभाऊंनी नानासाहेबांना प्रश्न केला. दिनूभाऊ म्हणजे अत्यंत स्वाभिमानी पुणेकर. पुण्यातल्या कुठल्याही गोष्टीला कुणी नावं ठेवलेली त्यांना आवडत नाहीत. मागे एका चौकाला नाव ठेवतानाही त्यांनी आक्षेप घेऊन न्यायालयात याचिका दाखल केली होती.

“दिनूभाऊ, त्यांना तुमच्यासारखा पुण्याबद्दल जाज्वल्य अभिमान नसेल, पण आस्था नक्कीच आहे. तेव्हा तुम्ही जरा शांत राहा.” कुणीतरी समजावलं, तसं दिनूभाऊंनी त्यांची तलवार म्यान केली.

“तुम्हाला बदलांचा काय त्रास होतोय, नानासाहेब?” मधू मध्येच म्हणाला.

“बदल नेहमी चांगलेच असतात की. तुमच्या जुन्या शेजारणीला बघून बघून तुम्ही कंटाळला होतात. आता नवीन शेजारीण आली. आता येणारं वर्ष तुमच्या डोळय़ांच्या आरोग्यासाठी उत्तम जाणार, नानासाहेब.” मधूच्या या वाक्यावर मात्र नानासाहेब गोरेमोरे झाले.

“मध्या, अरे आजूबाजूला माणसं आहेत. जरा बघून बोलत जा की.” नानासाहेब ओरडले आणि सगळय़ा मित्रमंडळानं खुसपुसून हसून घेतलं.

नानासाहेबांना एकूणच आजूबाजूला बदलत असलेल्या परिस्थितीबद्दल आक्षेप होते. पुण्यातली वाढती गर्दी, वाहतुकीची बेशिस्त, कुठेही कशाही गाडय़ा उभ्या करण्याची पद्धत, रस्त्यांवर सदोदित सुरू असलेली कामं, त्यासाठी खणले जाणारे खड्डे, उत्सवांचं बदलतं स्वरूप, एक ना अनेक. सगळय़ा विषयांचा आढावा घेऊन त्यांनी आपली उद्विग्नता व्यक्त केली. 2023 या वर्षाच्या सुरुवातीलाही आपण अशीच चर्चा केली होती आणि आता त्यात आणखी भर पडली आहे, हेही त्यांच्या बोलता बोलता लक्षात आलं.

“बरं, नवीन वर्ष सुरू होतंय. आपण सगळे काहीतरी नवा संकल्प करणार होतो. त्याचं काय झालं?” नानासाहेबांनी विषयाची गाडी वेगळय़ाच दिशेला वळवली आणि सगळय़ांच्या चेहऱयावरचा उत्साह एकाएकी मावळला.

“आता काय झालं? पुण्यातल्या सगळय़ा गाडय़ा सिग्नलवर झेब्रा ाढा@सिंगच्या अलीकडे थांबल्याचे बघून जसा धक्का बसेल, तसे चेहरे का केलेत?” नानासाहेबांनी पुन्हा विचारलं.

“म्हणजे?” पुण्यातल्या गाडय़ा सिग्नलला थांबत नाहीत की काय?” जाज्वल्य दिनूभाऊ पुन्हा उसळले.

“थांबतात, पण पोलिसमामा समोर असल्यावर.” कुणीतरी त्यांची खोडी काढली.

“पण पोलिसमामा चौकात कुठे असतात? ते तर बरेचदा एखाद्या झाडाच्या आडोशाला, वळणाच्या पलीकडे सुरक्षित ठिकाणी असतात ना.” राजूभैयांनी त्यांच्या मताची पिंक टाकली आणि दिनूभाऊंनी पुन्हा अस्तन्या सावरल्या. आता वादाला तोंड फुटणार एवढय़ात मध्यानं मध्यस्थी केली. वाद तेवढय़ापुरता मिटला.

“नानासाहेब, नवीन वर्षाचा संकल्प म्हणजे राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यासारखा असतो. निवडणूक झाल्यावर सगळे त्यातली आश्वासनं विसरून जातात.” धनंजयरावांनी त्यांची एक्सपर्ट कमेंट केली आणि नानासाहेबांनी त्यांच्याकडे रागाने बघितलं.

“गेल्या वर्षी आपण नियमित व्यायामाचा संकल्प केला होता.” नानासाहेबांनी सगळय़ांना आठवण करून दिली.

“मग तो संकल्प तर आपण पूर्ण केलाय.” दिनूभाऊ आत्मविश्वासानं म्हणाले.

“पण त्याचबरोबर आणखीही काही संकल्प केले होते, आठवतंय का?” नानासाहेबांच्या या प्रश्नावर सगळय़ांचा गोंधळ उडाला. कुणालाच काही आठवत नव्हतं.

“तुम्ही विसरणार हे माहीत होतंच. म्हणूनच मी लिहून ठेवले होते सगळय़ांचे संकल्प.” नानासाहेबांनी हळूच खिशातून एक डायरी काढली. त्यात प्रत्येकाचं नाव आणि त्याचा संकल्प लिहिलेला होता. दिनूभाऊंच्या नावापुढे लिहिलं होतं – कारण नसताना कुठल्याही गोष्टीचा चुकीचा अभिमान बाळगणार नाही. मधूच्या नावापुढे होतं – भोचकपणा करून कुणाला चिडवून पुणेकर असल्याचं सिद्ध करणार नाही. राजूभैयांच्या नावापुढे लिहिलं होतं – खोचक कमेंट करून कुणाचे पाय खेचणार नाही. बाकीच्यांच्या नावांसमोरही त्यांच्या संकल्पांचे तपशील होते.

“नानासाहेब, तुम्ही स्वतसुद्धा एक संकल्प केला होतात. पूर्वी पुण्यात असं नव्हतं, असं सारखं सारखं ऐकवून दाखवणार नाही. होणारे बदल योग्य असतील तर ते स्वीकाराल.” मध्यानं आठवण करून दिली आणि नानासाहेबही किंचित वरमले.
असो. थोडक्यात काय, गेल्या वर्षी केलेले संकल्प आपल्याला पुढच्या वर्षासाठीही कायम ठेवावे लागणार आहेत, हेही सगळय़ांनी मान्य केलं. नानासाहेबांनी पुन्हा या संकल्पांच्या नोंदी ठेवाव्यात, असंही ठरलं.

“आजच नवीन डायरी विकत घेतो.” नानासाहेब म्हणाले.

“खरं सांगायचं तर पूर्वीसारख्या डायऱया मिळतच नाहीत हल्ली.” जाता जाता त्यांनी आठवण करून दिली आणि सगळय़ांनी पुन्हा एकदा तुळशीबाग शनिवारी संध्याकाळी ओस पडली असल्यासारखा चेहरा केला.

[email protected]
(लेखक मनोरंजन क्षेत्र व समाज माध्यम विशेष लेखक आहेत.)