ठसा – सदानंद दाते

>> प्रभाकर पवार

महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख सदानंद दाते यांची नुकतीच राष्ट्रीय तपास यंत्रणांचे (NIA) प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. सदानंद दाते हे 1990 च्या बॅचचे थेट आयपीएस अधिकारी आहेत. पुण्यात वाढलेल्या व तेथेच शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पार पडलेल्या सदानंद दाते यांना वाचनाची प्रचंड आवड होती. वडिलांचे लवकर निधन झाल्याने त्यांना लहानपणी प्रचंड मेहनत घ्यावी लागली. दारोदारी वर्तमानपत्रांचे वाटप करून त्यांनी आपल्या आईला हातभार लावला. अशा संस्कारी, मेहनती, चिकाटीच्या सदानंद दाते यांना पुण्यात कॉमर्सची पदवी प्राप्त केल्यानंतर खासगी पंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करायची होती. एका कंपनीत ऑडिट करताना त्यांना तेथे गैरव्यवहार आढळला. त्यांना ते रुचले नाही. त्यांनी ती नोकरी सोडली. सरकारी नोकरी सदानंद दातेंना करायची नव्हती. कारण शासन म्हणजे भ्रष्टाचार, असा त्यांचा समज होता. दाते भ्रष्टाचाराच्या विरुद्ध होते, परंतु त्यांच्या पुण्यातील एका गुरुजींनी शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिल्याने सदानंद दाते आपल्या मनाच्या विरोधात सरकारी नोकरी करण्यासाठी तयार झाले. ‘यूपीएससी’ची परीक्षा देऊन ते उत्तीर्ण झाले, परंतु उत्तीर्ण झाल्यानंतर आयपीएस सेवेची त्यांची सुरुवात चांगली झाली नाही.

1993 साली चिपळूणला दाते यांची सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून पहिली पोस्टिंग! आयपीएसचे शिक्षण पूर्ण केल्यामुळे दाते यांचा आत्मविश्वास वाढला होता. नवीन पदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी सदानंद दाते पोलीस अधीक्षक म्हणून आलेल्या आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी रत्नागिरीला पोहोचले, परंतु त्या वरिष्ठ अधिकाऱयाने एका सळसळत्या रक्ताच्या उमद्या तरुण आयपीएस अधिकाऱ्याला कार्यालयाबाहेर दोन तास बसवून ठेवले. केबिनमध्ये बोलविल्यानंतर त्या अधिकाऱयाने समोरच्या खुर्चीत बस असेही सांगितले नाही. उलट सदानंद दातेंनाच खडसावले. ते म्हणाले, ‘तुम्ही सर्व आयपीएस अधिकारी दारू-मटक्यांच्या अड्डय़ांवर धाडी टाकण्यात धन्यता मानता. एक लक्षात ठेवा. असले चाळे माझ्या जिल्हय़ात चालणार नाहीत.’

नोकरीच्या पहिल्याच दिवशी आपल्याच खात्यातील निवृत्तीला आलेल्या भ्रष्ट वरिष्ठाने अगदी उघडपणे दिलेला इशारा सदानंद दाते यांच्यासाठी धक्कादायक होता, परंतु ते डगमगले नाहीत. उपजत प्रतिभावंत, संयमी असलेल्या या अधिकाऱ्याने वरिष्ठांचे आव्हान स्वीकारले. जिल्हय़ात जेवढे जेवढे गैरधंदे होते ते धाडी टाकून उद्ध्वस्त केले. दाते यांचा भ्रष्टाचारी पोलिसांविरुद्ध लढा सुरू असतानाच केवळ आठ दिवसांत सदानंद दाते यांची वर्ध्याला बदली करण्यात आली, परंतु जेथे जेथे बदली व्हायची तेथे तेथे सदानंद दाते आपला पोलिसी खाक्या दाखवायचे. त्यामुळे त्यांच्या वारंवार बदल्या व्हायच्या, परंतु महाराष्ट्र पोलीस दलात ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या पोलिसी ब्रीदवाक्याला खरा न्याय कुणी दिला असेल तर सदानंद दाते यांनीच. त्यामुळेच त्यांना महाराष्ट्र ‘एटीएस’चे प्रमुख व आता ‘एनआयए’चे महासंचालक म्हणून संधी मिळाली आहे. कर्तबगार, कार्यकठोर अधिकाऱयाला कधी तरी न्याय मिळतोच. सदानंद दाते यांची आयपीएस म्हणून 34 वर्षे सेवा पार पडली आहे. त्यांची निवृत्तीची अजून दोन वर्षे शिल्लक आहेत. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून ते स्पर्धेत होते, परंतु रश्मी शुक्ला यांना अधिकची (मुदतवाढ) दोन वर्षे ‘डीजीपी’ म्हणून मिळाल्याने विवेक फणसळकर, सदानंद दाते व अन्य बऱयाच अधिकाऱयांची संधी हुकली आहे एवढे मात्र नक्की!

जे. एफ. रिबेरो म्हणतात, ‘सदानंद दाते म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांच्या नभांगणातला एक तारा आहेत. आपल्या कारकीर्दीत त्यांनी कधीही न्यायाची आणि सत्याची कास सोडली नाही.’

अतिरेकी, देशद्रोहय़ांवर कारवाई करताना सदानंद दाते कधीही सत्याची कास सोडणार नाहीत. म्हणूनच त्यांची एनआयएमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे, असे आज सारी जनता बोलत आहे.

[email protected]