स्वराज्याची पहारेकरी कलावंतीण

>> संजय कदम

छत्रपती शिवरायांनी स्वराज्यावर टेहळणी करण्याकरिता ज्या सुळक्याची निवड केली त्यापैकी एक म्हणजे, पनवेलजवळील प्रबळगडावरील ‘कलावंतीण’ सुळका. ऐतिहासिक, नैसर्गिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेला कलावंतीण सुळका हा ट्रेकर्ससाठी नेहमीच आव्हान ठरला आहे. पश्चिम घाटातील सर्वात आव्हानात्मक असलेल्या या सुळक्याला दोन हजार वर्षांपूर्वीची पार्श्वभूमी आहे. कातळ कोरीव पायवाट यासाठी हा सुळका जगप्रसिद्ध आहे.

पावणेदोन तासांचा साहसी ट्रेक

या सुळक्यावरील कातळात पाण्याच्या दोन टाक्या आणि एक गुंफा आहे. या सुळक्यावर कोणत्याही प्रकारचे बांधकाम नाही. वाटेत कातळावर कोरलेल्या गणपती बाप्पाचे दर्शन मनाला ऊर्जा देते. पायथ्यापासून माची एक तास आणि माचीपासून कलावंतीण सुळका पाऊण तास असा पावणेदोन तासांचा हा साहसी ट्रेक आहे. एकदा का हा सुळका सर केला की त्याच्या कळसावर किमान पन्नास जण अगदी आरामात उभे राहू शकतात. या कळसावरून कोकणापासून घाटापर्यंत स्वराज्याचा शेकडो किलोमीटरचा अख्खा टापू नजरेत भरतो.

नैसर्गिक ‘नेड’

पृथ्वीच्या पोटातून लाव्हारस उसळून वर आला. हा रस वर आल्यानंतर त्याचे खडक बनले. लाव्हारस थंड होताना हवेच्या झोतामुळे त्या खडकात पोकळ्या तयार होतात. त्या आरपार दिसतात. त्या पोकळीला नेड म्हणतात. आपण कान टोचले तर कानाच्या पाळीला जशी भोके दिसतात, तशा या नेडी दिसतात. कलावंतीण सुळक्यावर अशा नैसर्गिक नेडी आहेत. हा निसर्गाचा एक चमत्कारच आहे. या नेडीतून आरपार जाणे हे साहस अनुभवायचे असेल तर कलावंतीण सुळका सर करावाच लागेल.

असे जा…

– पनवेल रेल्वे स्टेशनला उतरा
– पनवेल एसटी स्टॅण्डहून वारदोली-ठाकूरवाडी एसटी पकडा.
– शेवटच्या ठाकूरवाडी स्टॉपवर उतरा.
– तिथून पायी डांबरी सडकेने प्रबळगडाकडे कूच करा.

हे नियम पाळा

– सकाळी सहाच्या आधी कलावंतीणच्या दिशेने जाण्यास परवानगी नाही.
– सायंकाळी 5 नंतर सुळक्याकडे जाण्यास प्रवेशबंदी.
– गाईडशिवाय सुळक्यावर जाऊ नका.
– पावसाळ्यात मात्र इथे येणे टाळा.

इथे उदरभरण करा

– प्रबळगड चढताना वाटेत माची प्रबळवाडी लागते.
– इथे 40 ते 45 घरांची वस्ती आहे.
– न्याहारी व जेवणाची व्यवस्था होईल.
– इथे तुम्ही टेंट पॅम्पिंग अथवा घरगुती मुक्काम करू शकता.