दिल्ली डायरी – भाजपमधील असंतोष आणि गुप्त भेट

>> नीलेश कुलकर्णी, [email protected]

गेल्या नऊ वर्षांपासून भाजपात जेहम दोचे मनमानी राज्य चालले आहे, त्याविरोधातला असंतोषाचा लाव्हा आता बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. ‘हम दोच्या गाठीशी पाशवी बहुमत असल्याने कोणाचीही विरोधात आवाज करण्याची बिशाद नव्हती. थोडीफार धमक नितीन गडकरींनी दाखविली होती. त्याची किंमत त्यांना मोजावी लागली. आता गडकरी राजनाथ सिंगांची एका अज्ञात स्थळी भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. गडकरी राजनाथ हे केवळ केंद्रीय सरकारातले मंत्री नाहीत, तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविलेले नेते आहेत. त्यामुळे अशी घडामोड भाजपमध्येऑल इज नॉट वेलहेच दर्शविते.

दिल्लीत भाजपच्या विधानसभा निवडणुकांच्या धास्तीपोटी बैठकांमागून बैठका होत आहेत. या बैठकांना एरवी गेल्या नऊ वर्षांपासून मीडिया फुटेजमध्येही न दिसणारे राजनाथ सिंग प्रकर्षाने दिसत आहेत. राजनाथ यांना अचानक ‘अच्छे दिन’ येण्यामागे बरीच कारणे आहेत. किस्सा राजनाथ सिंग गृहमंत्री असतानाचा आहे. पत्रकारांशी अनौपचारिकपणे बोलताना राजनाथ यांनी स्पष्टच सांगितले होते, ‘‘मैं तो सिर्फ सलामी लेने का गृहमंत्री हूं. मैं एक दरोगा की भी नियुक्ती नही कर सकता. हां… आप को चाय बिस्कूट तो खिला सकता हूं’’, अशी मिश्कील टिपणी करत राजनाथ यांनी ‘मन की बात’ त्या वेळी मांडली होती. त्यानंतर गृहमंत्रीपदावरून त्यांची पाठवणी संरक्षण खात्यात करण्यात आली. मात्र मंत्री म्हणून असणारे अधिकार व स्वातंत्र्य काही त्यांच्या नशिबी आलेच नाही. मोदी सरकारातले मंत्री फक्त लवाजम्याचे मंत्री आहेत, अधिकार कोणालाच नाहीत, अशी उघड चर्चा होते. त्यात नितीन गडकरी यांनी पहिल्या टर्ममध्ये आपल्या हिमतीवर काही कामे करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचीही कोंडी दुसऱ्या टर्ममध्ये करण्यात आली. इतकी की, गडकरींच्या एका वादग्रस्त खासगी सचिवाला घरी बसवा, असा आदेश थेट अमित शहा यांनीच दिला होता. त्याची चर्चाही खूप रंगली. लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या आहेत. देशभरात भाजपविरोधात वातावरण आहे. राजस्थान, मध्य प्रदेशात जनता भाजपवर किती व कशी नाराज आहे, याची झलक दिसत आहे. त्यातच नऊ वर्षांपासून सर्वांनाच घातली गेलेली ‘वेसण’ आता ढिली पडू लागली आहे. राजस्थानात अनेक ठिकाणी संघाच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणून मैदानात उडी मारली आहे. चाल, चरित्र, चेहरा सांगणाऱ्या भाजप नेतृत्वापुढे या ‘हार्डकोर’ लोकांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. विधानसभेतील दाणादाण लक्षात घेऊन महाशक्तीला आतापासूनच कापरे भरायला सुरुवात झाली आहे. गडकरी-राजनाथ यांचे या वातावरणात एकमेकांना रामराम करणे हा मोठा योगायोग आहे. भाजपला बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश आले आणि काठावरचे बहुमत मिळाले तर महाशक्तीचे पार्सल गुजरातला पाठवून गडकरी किंवा राजनाथ यापैकी एकाकडे देशाचे नेतृत्व द्यावे, असा नागपूरचाही मानस असल्याचे समजते. त्यामुळेच या तथाकथित गुप्त भेटीला उघड उघड राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

अतिशी यांचे ‘बढते कदम’

अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली सरकारमधील सर्वात महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या जलखात्याची जबाबदारी सौरभ भारद्वाज यांच्याकडून काढून घेत अतिशी यांच्याकडे देऊन त्यांचे वाढते राजकीय महत्त्व अधोरेखित केले आहे. या जलखात्याबरोबरच आता अतिशी यांच्याकडील खात्यांची संख्या तेरा झाली आहे. मद्य घोटाळाप्रकरणी तुरुंगात जाण्यापूर्वी त्या वेळचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याकडे तब्बल अठरा खाती होती. सिसोदिया त्या वेळी केजरीवालांचे राईट हॅंड मानले जायचे. आता अतिशी यांच्याकडे नंबर टू म्हणून पाहिले जात आहे. ऑक्सफर्डमधून शिकलेल्या अतिशी उच्चविद्याविभूषित तर आहेतच, शिवाय मध्यमवर्गीयांमध्ये त्यांनी आपली स्वतःची इमेज तयार केलेली आहे. शिक्षणक्षेत्रातला त्यांचा व्यासंग दांडगा आहे. आम आदमी पार्टीमध्ये तसाही महिला चेहरा नव्हता. अतिशी यांच्या रूपाने केजरीवालांना तो चेहरा मिळाला आहे. अतिशी यांचे हे बढते कदम त्याचेच निदर्शक आहे. सिसोदिया व संजय सिंग हे आपचे दोन ठाकूर समाजाचे नेते सध्या तुरुंगात आहेत. त्यांची रिप्लेसमेंट म्हणून अतिशी यांच्याकडे पाहिले जात आहे.

थोडा ‘रहम’ करो

अफलातून अभिनेत्री वहिदा रेहमान यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार राजधानीत एका शानदार समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याचे कौतुक सोहळेही रंगले. मात्र या कौतुक सोहळ्याची काळी बाजू आता प्रकाशात येऊ लागली आहे. या सोहळ्यावेळी विज्ञान भवनात वहिदा यांना जो कटू अनुभव आला तो सरकारी अनास्थेची अब्रू चव्हाटय़ावर आणणारा आहे. या सोहळ्यासाठी वहिदा रेहमान विज्ञान भवनात आल्या त्या वेळी त्यांना साधे रिसीव्ह करायलाही प्रोटोकॉल ऑफिसर नव्हता. मुख्य प्रवेशद्वारापासून कार्यक्रम स्थळापर्यंत जाण्यासाठी त्यांच्या सोबत कोणाचीही नियुक्ती केली गेली नव्हती. वहिदा यांच्या सोबत त्यांचे चिरंजीव सोहेल रेखीही आले होते. मात्र सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांनाही वहिदा यांच्या सोबत जाऊ दिले नाही. त्यामुळे वयोवृद्ध वहिदा यांना एकटीनेच कार्यक्रम स्थळापर्यंत जावे लागले. चालत जाताना त्यांना त्रास होत होता हेही जाणवत होते. मात्र तरीही साधी माणुसकी वहिदा यांच्या बाबतीत सरकारकडून दाखविली गेली नाही. अशा महत्त्वाच्या कार्यक्रमात असा गोंधळ होऊ नये याची खबरदारी सरकारने घ्यावी आणि वहिदा रेहमान यांच्यासारख्या ज्येष्ठ व वयोवृद्ध कलाकारांवर माणुसकीची रहम दाखविण्याची दयाळू वृत्तीही दाखवायला हवी.