देशात आणि राज्यात परिस्थिती बदलली, जनतेत भाजपविरोधी लाट; बाळासाहेब थोरात यांचा निशाणा

लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यापैकी दोन टप्प्यांचे मतदान झाले आहे. त्यात मतदानाची टक्केवारी घसरली असून भाजपचे टेन्शन वाढले आहे. तसेच जनतेचा कौल इंडिया आघाडीकडे दिसत आहे. देशातील या परिस्थितीबाबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महत्त्वाचा दावा केला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी 40 पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला आहे.

सध्या देशात आणि राज्यात आता परिस्थिती बदलली आहे. जनतेत भाजपविरोधी लाट आहे. भाजपबाबत जनतेचा रोष देशभरात दिसून येत आहे. भाजपच्या खोट्या आश्वासनांना जनता आता कंटाळली आहे. त्यामुळे भाजपच्या कोणत्याही फसव्या आश्वासनांना जनता भुलणार नाही. तसेच राज्यात महायुती अडचणीत असल्याचे दिसत आहे. त्यांच्यात जागावाटपावरून मतभेद आहेत. तसेच जागावाटप झालेल्या ठिकाणी ते उमेदवारीचा निर्णयच घेऊ शकत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडी भक्कम स्थितीत असून महाविकास आघाडीला 40 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.

आपल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान आणि भाजप नेते बेरोजगारी, महागाई, जनतेच्या समस्या यावर बोलत नाहीत. ते फक्त धार्मिक मुद्द्यांवर बोलतात. एका समुदायाविरोधात बोलले की दुसऱ्या समुदायाची मते मिळतील, या हेतूने ते जनतेत द्वेष पसरवत आहेत, असा हल्लाबोलही थोरात यांनी केला.