सांगलीत प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले

सांगली लोकसभा मतदारसंघातील ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या मोटारीला अज्ञातांनी चपलांचा हार घालून काळे फासले. तसेच ‘निवडणुकीतून माघार घ्या आणि मराठा समाजाच्या नादी लागू नका,’ असा धमकीचा मजकूर असलेले पत्र चिकटविण्यात आले आहे. सांगलीतील सर्व्हिस रस्त्यावरील हॉटेल ‘ग्रेट मराठा’समोर आज हा प्रकार घडला. या घटनेने खळबळ उडाली आहे.

माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी सांगली लोकसभा मतदारसंघात ओबीसी बहुजन पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांनी प्रचारही सुरू केला आहे. सांगलीत मुक्कामास असताना ते ‘ग्रेट मराठा’ हॉटेलमध्ये उतरले होते. त्यांची मोटार हॉटेलसमोर पार्ंकगमध्ये लावली होती. पहाटे कोणीतरी त्यांच्या मोटारीला चपलांचा हार घालून मोटारीवर काळा रंग फासला. तसेच धमकीचा मजकूर असलेले पत्र चिकटविण्यात आले.

या पत्रात ‘निवडणुकीतून माघार घ्यावी, नाशिकमध्ये जशी माघार घेतली, तशी सांगलीतून माघार घ्यावी. मराठा समाजाच्या नादी लागू नका,’ असा मजकूर लिहिलेला आहे. आज सकाळी शेंडगे यांचा चालक मोटारीजवळ आल्यानंतर त्याला हा प्रकार दिसला. त्यानंतर शेंडगे यांच्यासह कार्यकर्तेही मोटारीजवळ जमले. त्यांनी ‘यळकोट यळकोट जय मल्हार’च्या घोषणा दिल्या.

पळून जाणार नाही; निवडणूक लढवणारच – प्रकाश शेंडगे

n प्रकाश शेंडगे म्हणाले, ‘माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही. मात्र, मनोज जरांगेंची मागणी संपूर्ण मराठा समाजाला ओबीसीमध्ये घुसवण्याची आहे. त्याला आमचा विरोध आहे. ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष सांगली जिह्यात नव्हता. मात्र, आता उघडपणे मला धमकी दिली आहे. भुजबळांनी माघार घेतली आहे. तुम्ही माघार का घेत नाही? माघार नाही घेतली तर चपलेचा हार घालून काळे फासले जाईल,’ असा इशारा दिला आहे. निवडणूक मुक्त वातावरणात झाली पाहिजे. लोकशाहीत कोणालाही मते मागण्याचा अधिकार आहे. माझी कार्यकर्त्यांना, तसेच मराठा समाजाला विनंती आहे, ही निवडणूक शांततेत पार पाडूया. वाद घालण्याची आमची इच्छा नाही. यापूर्वी कधी येथे असा प्रकार घडला नाही. आम्ही या घटनेचा निषेध करतो. याबाबत निवडणूक आयोग, तसेच पोलिसांकडे तक्रार करणार आहे. ओबीसी व धनगर समाज हा प्रकार सहन करणार नसून, या इशाऱयांना मी घाबरणार नाही. पळून जाणार नाही, निवडणूक लढणारच,’ असा इशाराही प्रकाश शेंडगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.