शंभू रेल्वे स्टेशनवर शेतकऱयांना धक्काबुक्की

शेतमालाला किमान हमीभावासह विविध मागण्यांसाठी 13 फेब्रुवारीपासून शंभू बॉर्डरवर ठाण मांडून बसलेले शेतकरी आज आणखी आक्रमक झाले.  शेतकऱयांच्या आंदोलनाकडे मोदी सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे आज त्यांचा संयम सुटका आणि शंभू रेल्वे स्टेशनच्या दिशेने त्यांनी कुच केले. पोलिसांनी शेतकऱयांना अडवण्याचा प्रयत्न केला, त्यांना धक्काबुक्की केली. त्यामुळे काही शेतकरी किरकोळ जखमी झाले. मात्र शेतकऩयांनी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रेल्वे स्टेशन गाठून रेल्वेमार्गावरच बस्तान मांडले आणि रेल्वेमार्ग बराच काळ रोखून धरला.

मोदी सरकारने तुरुंगात डांबलेल्या शेतकरी नेते नवदीप सिंह जलबेडा यांच्यासह तीन शेतकऱयांची सुटका करण्याची मागणी आज शेतकऱयांनी लावून धरली. याप्रकरणी शेतकऱयांची हरयाणा आणि पंजाब सरकारसोबत बैठक झाली होती. सरकारने शेतकऱयांच्या सुटकेचे आश्वासन दिले होते. शेतकऱयांनीही सरकारला 16 एप्रिलपर्यंतचा वेळ दिला होता. त्यानंतर आज शेतकऱयांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.

आम्हाला रेल्वेमार्ग रोखून धरायचा नाही, परंतु सरकार हे करण्यासाठी आम्हाला भाग पाडत असल्याचे शेतकरी नेते सरवण सिंह पंधेर म्हणाले.

रेल्वेच्या 34 फेऱया रद्द

शेतकऱयांनी रेल्वेमार्ग रोखून धरल्यामुळे रेल्वेच्या तब्बल 34 फेऱया रद्द करण्यात आल्या. 11 रेल्वे पूर्णपणे रद्द केल्या तर अनेक रेल्वे फेऱयांचे मार्ग बदलण्यात आले. काही रेल्वेगाडय़ांचे मार्ग मर्यादित करावे लागले. दरम्यान, जोपर्यंत शेतकऱयांची सुटका करण्यात येत नाही तोपर्यंत रेल्वेमार्ग रोखून धरण्याचा निर्धार शेतकऱयांनी केल्याचे शेतकरी नेते जगजीत डल्लेवाल यांनी सांगितले. शेतकऱयांना सोडल्यानंतर 10 मिनिटांत रेल्वेमार्ग मोकळा करू, असे ते म्हणाले.