व्हॉट्सअप डाऊनलोड करताय… सावधान

सामना ऑनलाईन । मुंबई

सोशल मेसेजिंग अॅप्लिकेशन व्हॉट्सअॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करताय? जरा थांबा!..कारण सध्या प्ले स्टोअरवर व्हॉट्सअॅपचं एक बनावट व्हर्जन उपलब्ध आहे. ते डाऊनलोड केल्यास धोक्याचं ठरू शकतं. आतापर्यंत ५ हजारांहून अधिक यूजर्स या बोगस व्हॉट्सअॅपच्या जाळ्यात अडकले आहेत. ही बनावट आवृत्ती असल्याचं म्हटलं जात आहे.

गुगल प्ले स्टोअरवर ”Update WhatsApp Messenger” या नावाने हे अॅप दिसतं. ते ‘WhatsApp Inc’ ने विकसित केलं आहे, असा उल्लेखही करण्यात आला आहे. ते आतापर्यंत ५ हजार वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. इतकंच नाही तर प्ले स्टोअरवर याच नावाचे आणखी एक अॅप उपलब्ध असून १० लाख वेळा ते डाऊनलोड करण्यात आलेले आहे. हे अॅप डाऊनलोड केल्यास फोनमधील माहिती चोरीला जाण्याची शक्यता आहे.

एखाद्या यूजरची बदनामीही केली जाऊ शकते, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच यूजरच्या मोबाइल फोनमध्ये व्हायरस घुसण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. या बनावट अॅपची माहिती सर्वात आधी WABetaInfo या व्हॉट्सअॅप ट्रॅकिंग वेबसाइटने एका ट्विटर यूजरच्या माध्यमातून दिली आहे. हे बोगस अॅप डाऊनलोड करू नका, असे आवाहन करण्यात आले आहे. व्हॉट्सअॅपने याबाबत गुगल प्ले स्टोअरला कळवून ते काढून टाकण्याची मागणी करावी, असेही वेबसाइटने म्हटले आहे.