प्रणितीला फोडण्याचा भाजपने खूप प्रयत्न केला; सुशीलकुमार शिंदे यांचा गौप्यस्फोट

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझी मुलगी प्रणिती शिंदेला उमेदवारी देण्यासाठी भाजपने खूप प्रयत्न केले. मात्र प्रणिती शिंदे गांधी-नेहरू यांच्या विचारांबरोबरच काँग्रेस पक्षासोबत प्रामाणिक राहिल्या. सोलापूर लोकसभेसाठी त्या प्रबळ उमेदवार असल्याने भाजपमधील दिग्गज नेत्यांनी प्रणिती शिंदे यांना फोडण्याचा खूप प्रयत्न केला, असा गौप्यस्फोट करीत माजी केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपाचा भंडाफोड केला.

काँग्रेसच्या वतीने अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, पंढरपूर, मोहोळ तालुक्यात संकल्प सभा घेण्यात येत असून त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. मोहोळ येथील सभेत शिंदे यांची भाजपचा भंडाफोड केला.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, प्रणिती शिंदे यांनी तीन विधानसभा निवडणुका मोठय़ा मताधिक्क्याने जिंकल्याने ती खूप स्ट्राँग बनली आहे. सोलापूर लोकसभेसाठी भाजप प्रणिती शिंदे यांच्यासाठी खूप प्रयत्न करत होता. त्या प्रबळ उमेदवार असल्याचा फायदा घेण्यासाठी भाजप प्रयत्न करत हाता. मात्र प्रणिती शिंदे या गांधी-नेहरू यांच्या विचाराबरोबर काँग्रेस पक्षासोबत प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहिल्या आहेत. प्रणितीला भाजपामध्ये घेण्यासाठी दिग्गज नेत्यांनी खूप प्रयत्न केला, असा गौप्यस्फोटही शिंदे यांनी केला.

महाविकास आघाडीने सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी अद्यापही उमेदवारी जाहीर केली नसली तरी आमदार प्रणिती शिंदे व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जिह्यात प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. या वेळी त्यांच्यासमवेत राज्याचे माजी गृह राज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे, चेतन नरोटे उपस्थित होते.

मोदी मुख्यमंत्री असतानाच बरे होते

मी जेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हा नरेंद्र मोदीही गुजरातचे मुख्यमंत्री होते. मोदी मुख्यमंत्री होते तोपर्यंतच बरे होते. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या डोक्यात काय गेलं माहिती नाही, असा टोला सुशीलकुमार शिंदे यांनी लगावला.