काव्यरसग्रहण – मन… मन…मन…

 

>> गुरुनाथ तेंडुलकर

सांजवेळ ही… कातर कातर

तुझ्या मनाला… सावर सावर

नकोनकोशा आठवणींनी

भरले डोळे… घागर घागर

घडायचे ते घडून गेले

आता हुंदके… आवर आवर

देवापुढती दिवा लाव ना,

प्रकाश होईल घरभर मनभर

कवी : सदानंद डबीर कवितासंग्रह : तसबीर, प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन

इंटरनेटवर वाचलेला एक किस्सा… एक मध्यमवयीन माणूस एका मानसोपचार तज्ञाकडे गेला कारण त्याच्या अनेक पारी होत्या. रात्री झोप लागत नाही, भयानक स्वप्नं पडतात, दिवसभर नको नको त्या आठवणी मनात पिंगा घालतात, अशा प्रकारच्या त्याच्या पारी होत्या. नवऱयाच्या फिरतीच्या नोकरीचा गैरफायदा घेऊन त्याची बायको दोन्ही मुलांना घरीच ठेवून मित्राबरोबर परदेशी निघून गेली होती. तिथून तिने घटस्फोटाचा अर्ज पाठवून दिला होता. या सगळ्या धक्क्यातून सावरणं त्या माणसाला फारच जड जात होतं.

डॉक्टरांनी त्या माणसाचं सगळं बोलणं नीट ऐकून घेतलं. त्याला काही औषधं लिहून दिली आणि म्हणाले, “सतत विचार करू नका. दुसरीकडे मन गुंतवायचा प्रयत्न करा. बरेच दिवसांत तुम्ही खळखळून हसला नसाल. थोडं हसा.”

“कसा हसू डॉक्टर? हसण्यासारखं काय उरलंय आता?”

“शहरात एक सर्कस आली आहे. त्या सर्कशीत एक विदूषक आहे. त्याचेचाळे आणि चेष्टा पाहाल तर  तुम्हाला नक्की हसू येईल. मी कालच बघून आलो. एकदम फ्रेश झालो.”

त्यावर तो माणूस अधिकच खिन्न स्वरात म्हणाला, “डॉक्टर, ज्याच्याकडे बघून सगळे खळखळून हसतात, त्या विदूषकाचं काम करणारा माणूस मीच आहे.”

इंटरनेटवर आलेला हा किस्सा आज आठवायचं कारण म्हणजे पुढच्याच आठवडय़ात मला एका व्याख्यानाचं निमंत्रण आलं आहे आणि विषय आहे… ‘मन आणि माणूस!’

माणसाच्या मनाबद्दल अनेकांनी अनेक ठिकाणी खूप काही लिहिलं-बोललं आहे. देशातल्या ऋषीमुनींपासून ते पाश्चात्त्य तत्त्ववेत्त्यांपर्यंत अनेकांनी ‘मन’ या विषयावर मनन, चिंतन केलं आहे. तरीही कुणालाही अद्याप पुरतं न उलगडलेलं सर्वाधिक कठीण कोडं म्हणजे मानवी मन.

शरीराचे वेगवेगळे अवयव आणि त्यांची कार्ये दिसतात, दाखवता येतात. हे सर्व अवयव आणि त्यातील घटकांचं श्वसनसंस्था, पचनसंस्था, उत्सर्जन संस्था, पुनरुत्पादन संस्था, मज्जासंस्था अशा वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण करता येतं, पण मनाच्या बाबतीत मात्र…

मनाच्या बाबतीत हे मन नेमकं कुठे असतं हेच मोठं कोडं आहे. शरीरात की शरीराबाहेर? मन मेंदूत असतं का? मन आणि बुद्धी एकच असते का? निश्चितपणे काहीच सांगता येत नाही. बहिणाबाई चौधरी त्यांच्या ‘मन वढाय वढाय’ कवितेत लिहितात,

मन पाखरू पाखरू

काय सांगू त्याची मात

आता होतं भुईवरी

गेलं गेलं आभाळात…

असं क्षणात इकडे आणि क्षणात तिकडे धावणाऱ्या मनाच्या बाबतीत अनेकांनी अनेक ठिकाणी लिहिलंय. सुधीर मोघे यांनी लिहिलंय, ‘मन मनास उमगत नाही. आधार कसा शोधावा?’ विंदा करंदीकर म्हणतात, ‘माझ्या मना बन दगड.’ मधुसूदन कालेलकर लिहितात, ‘सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला.’ शांता शेळके कवितेतून विचारतात, ‘ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा, माझ्या मनातला का तेथे असेल रावा…’

हिंदीतील शायर साहिल लुधियानवी लिहितात, ‘तोरा मन दर्पण कहलाये, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाये.’

समर्थ रामदासांनी तर मनाला उपदेश करणारे दोनशे पाच मनाचे श्लोक लिहिले आहेत. भगवद्गीतेत भगवंतांनी ‘मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः’  (कोणत्याही बंधनात गुंतण्यासाठी किंवा त्यातून सुटण्यासाठी महत्त्वाचं, किंबहुना एकमेव कारण म्हणजे माणसाचं मन ) असं सांगितलं आहे.

हे सगळं कितीही खरं असलं तरी ज्या वेळी या मनाला जखमा होतात, त्या इतर कुणाला दाखवता येत नाहीत. मन अस्वस्थ होतं म्हणजे नेमकं काय होतं हे कुणाला शब्दांत सांगता येत नाही. मन भरकटतं म्हणजे नेमकं का, कुठे आणि कसं जातं? हे अनेकदा स्वतलाही कळत नाही.

मनात अलगद उठणारे तरंग किंवा मन ढवळून टाकणारा कल्लोळ हा प्रत्येकाचा वैयक्तिक अनुभव असतो. तो ज्याचा त्याने अनुभवायचा असतो. तो सहनही होत नाही की सांगताही येत नाही. मानसोपचार तज्ञ त्यावर उपचार करतात. अगदी समुपदेशनापासून ते औषधं देण्यापर्यंत अनेक उपचार केले जातात. तरीही… मनाच्या दुखण्यावर खरा उपचार हा ज्याचा त्याने करायचा असतो. प्रत्येकाने स्वतच्या मनाला कसं आवरायचं, कसं सावरायचं हे स्वतच ठरवायचं असतं. मनाच्या दुखण्यावर हळुवार फुंकर घालून त्याला सावरण्याचा उपाय सांगणारी आजची कविता.

कवी आहेत मराठीतील गझलकार सदानंद डबीर. छंदोबद्ध काव्यरचना हे त्यांच्या काव्याचं वैशिष्ट्य आहे. सदरची कविता जरी केवळ आठ ओळींची असली तरी आशय आणि सौंदर्य, दोन्ही बाबतीत ती परिपूर्ण आहे. या कवितेतील कडव्यातील दुसऱ्या ओळीत एकाच शब्दाची जी पुनरावृत्ती केली आहे ती केवळ लाजवाब…अप्रतिम…

[email protected]