नाराजांना टाळण्यासाठी मिंधे लपून बसले! भेटीसाठी आलेले गोडसे, भुसे, सामंतांची अनेक तास लटकंती

मिंधे गटाने लोकसभेसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर अन्य मतदारसंघांतील इच्छुकांची घालमेल वाढली आहे. त्यातील अनेक जण आपली उमेदवारी अद्याप जाहीर न झाल्यामुळे नाराज आहेत. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी धडपडत आहेत. पण शिंदे यांनी आता त्यांना टाळायला सुरूवात केली आहे. आज त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी अनेकांना तो अनुभव आला. अनेक तास ताटकळत बसल्यानंतरही मुख्यमंत्र्यांचा पत्ता नसल्याने अखेर त्यांना श्रीकांत शिंदे यांच्याकडे निरोप ठेवून काढता पाय घ्यावा लागला.

नाशिकमधील विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे मिंधे गटाचे आहेत. मात्र आता ती जागा भाजपला हवी आहे. भाजपने त्यासाठी प्रचंड दबाव आणला आहे आणि दुसरीकडे अजित पवार गटानेही साताऱयाच्या बदल्यात नाशिकची जागा मागितली आहे. गोडसे यांनी उमेदवारीसंदर्भात ठाणे येथील एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर शक्तीप्रदर्शन केले होते. त्यानंतरही त्यांची दोन वेळा भेट घेतली होती. आजही ते शिंदे यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत नाशिकचेच मंत्री दादा भुसे आणि सुहास कांदे हेसुध्दा होते. त्यांच्या आधीच तासाभरापूर्वीपासून मंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत हे मुख्यमंत्र्यांची वाट पाहत बसले होते.

सिंधुदुर्ग-रत्नागिरीच्या जागेवर किरण सामंत यांना उमेदवारी हवी आहे. परंतु तिथे भाजपला आपला उमेदवार उभा करायचा आहे. त्यामुळे निर्माण झालेला तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. रायगड राष्ट्रवादीला सोडल्यानंतर कोकणातील दुसरा मतदारसंघ तरी आपल्याकडे राहावा यासाठी उदय सामंत प्रयत्नशील असल्याने ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले होते.

n नाराजांचा रोष टाळण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे घरातून गायब झाले. तब्बल दोन तासानंतरही मिंधे न आल्याने गोडसे, भुसे, कांदे आणि सामंत बंधू अक्षरशः हैराण झाले. अखेर त्यांनी मुख्यमंत्री पुत्राशी चर्चा करून तिथून काढता पाय घेतला. गोडसे हे नाराज तोंडानेच नाशिकला निघून गेले तर भुसे, कांदे आणि सामंत मुंबईच्या दिशेने रवाना झाले.