परभणीत भाजप व अजित पवार गटात संघर्ष; जानकरांच्या उमेदवारीला विरोध

परभणीच्या जागेवरून भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गटामध्ये संघर्ष उफाळून आला आहे. भाजपचे बबनराव लोणीकर यांनी परभणीची जागा महादेव जानकर यांना देण्यापेक्षा भाजपनेच लढवावी, असा आग्रह पक्षश्रेष्ठाRकडे धरला आहे.

महादेव जानकर यांनी नुकताच महायुतीमध्ये प्रवेश केला. परभणी लोकसभा मतदारसंघाची जागा जानकरांना देण्यात येणार अशी चर्चा रंगली आहे. जानकर हे बारामतीमधून उभे राहण्यास इच्छुक होते, परंतु तिथे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना धक्का पोहोचू नये म्हणून त्यांची परभणीत सोय लावली जाणार आहे. त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित असून केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे. मात्र लोणीकर यांनी जानकरांच्या उमेदवारीला विरोध दर्शवल्याने अजित पवार गट टेन्शनमध्ये आला आहे.

परभणीची जागा मित्रपक्षाला दिल्यास ती कायमची भाजपच्या हातून जाईल अशी भीती लोणीकर यांनी व्यक्त केली आहे. कमळ निशाणीवर परभणीची निवडणूक लढल्यास दोन लाख मतांच्या फरकाने जिंकू, असा दावाही त्यांनी केला आहे. कारण परभणी लोकसभा मतदारसंघात भाजपचे 3 आमदार, 17 जिल्हा परिषदेचे सदस्य, 65 पंचायत समितीचे सदस्य, 92 कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे.