जिजामाता उद्यानात पशुपक्ष्यांना ‘गारेगार मेजवानी’!

उकाडा वाढत असल्यामुळे पालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील पशुपक्ष्यांना रसरशीत कलिंगड, आइसप्रुट केक, चिकू-पेरू, केळी, ऊस, सफरचंद, गारेगार भाजी आणि पशुपक्ष्यांना चणे-शेंगदाणे असा गारेगार आहार सुरू करण्यात आला आहे.

पालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात केवळ परदेशात आढळणाऱया पेंग्विनसह आता वाघ, बिबटय़ा, कोल्हा, तरस यांसह विविध प्रकारचे पक्षी आणल्याने मुंबईसह देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण वाढले आहे. मात्र सद्यस्थितीत वाढलेल्या तापमानामुळे प्राणी-पक्ष्यांनाही उकाडा असह्य होत आहे. त्यामुळे ऋतुमान बदलानुसार त्यांच्या आहारात बदल केला असल्याचे जीवशास्त्रज्ञ अभिषेक साटम यांनी सांगितले. राणीबागेत सध्या 40 हरणे, 20 ते 25 माकडे, हत्तीण, अस्वल, दोन बिबटे, दोन वाघ, दोन तरस, चार कोल्हे आणि शेकडो प्रकारचे पक्षी आहेत. हत्तिणीला फळे मिळवून खाण्याचा आनंद मिळावा म्हणून ती दोरीने उंच झाडावर टांगण्यात येत आहेत. शिवाय थंड पाण्याची आंघोळ घालण्यात येत आहे. ‘गारेगार मेजवानी’चा आस्वाद घेताना प्राण्यांना पाहून या ठिकाणी येणाऱया पर्यटकांचेही चांगलेच मनोरंजन होत आहे.

डुबकी मारण्यासाठी पाणी

प्राण्यांना देण्यात येणारी फळे थंड करून देण्यात येत आहेत. शिवाय विविध प्रकारच्या फळांचा थंडगार प्रुट केकही दिला जात आहे. नैसर्गिक अधिवासाप्रमाणे प्राण्यांना गुहा, डबकी, झुडपे तयार करण्यात आली आहेत. पक्ष्यांसाठीही भाजलेले चणे, शेंगदाणे, चिकू, पेरू, भोपळा, मध, गाजर, अशी फळे दिली जात आहेत.

वाघ, बिबटय़ांच्या जलक्रीडा आकर्षण

वाघबिबटे वाढलेल्या उकाडय़ापासून दिलासा मिळवण्यासाठी  थंडगार पाण्यात जलविहार करतानाचे दृश्य पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. वाघोबाला झाडावर टांगलेले चिकन, बीफ मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. माकडांना झाडांवर तर अस्वलाला बॉक्समध्ये फळे शोधावी लागत आहे.