मुद्दा – 7-5च्या डहाणू लोकलचे घोंगडे!

>> दयानंद पाटील (सचिव, डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था)

डहाणू लोकल 16 एप्रिल 2013 रोजी सुरू होऊन येत्या एप्रिल महिन्यात 11 वर्षे पूर्ण होत आहेत आणि प्रवासी संख्याही वाढली आहे आणि ही संख्या वाढतच आहे, परंतु डहाणू लोकलच्या फेऱया वाढविण्याबाबत पश्चिम रेल्वे नकारात्मक भूमिका घेत असल्याचे निदर्शनास येत आहे.

डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने रेल्वे अधिकाऱयांच्या भेटी घेऊन प्रवाशांच्या सर्व समस्या वारंवार मांडल्या आहेत. अलीकडेच पश्चिम रेल्वे अधिकाऱयांनी यासंदर्भात पाच दिवसांनी घोषणा केली जाईल असे म्हटले होते. कदाचित पश्चिम रेल्वेचे ऑपरेशन टीम (वेळापत्रक तयार करणारी) डहाणू लोकलचे वेळापत्रक तयार करण्यासाठी लागली असणार, जेणेकरून 7ः05ची लोकल कशा प्रकारे बसेल? अशी आशा होती की, पाच दिवसांनी घोषणा होईल. प्रवाशांनी आणखी दोन दिवसांची वाट पाहिली. कदाचित ‘गुड न्यूज’ मिळू शकेल असे वाटले होते, परंतु पुन्हा एकदा पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱयांनी प्रवाशांची थट्टा केली आहे, असे म्हणावे लागेल. वेळापत्रक तयार करणारी ऑपरेशन टीम इतकी महत्त्वाची आहे की, ते जे सांगतील तेच पश्चिम रेल्वेच्या DRM आणि GM यांना ऐकावे लागते का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तथापि त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या कार्यालयात कोण कोणाच्या हाताखाली काम करते तेच कळत नाही? आज अशा प्रकारे डहाणू विभागातील प्रवाशांचे सूर निघत आहेत की, इतक्या विनवण्या करूनही डहाणू लोकलच्या फेऱया वाढविण्याबाबत पश्चिम रेल्वे नकारात्मक भूमिका का घेत आहे? डहाणू लोकलच्या फेऱया वाढवू नयेत म्हणून रेल्वे अधिकाऱयांवर कोणाचा दबाव येत आहे का? अशी कोणती अदृश्य शक्ती असावी का? अशा अनेक प्रश्नांवर डहाणू-विरार प्रवासी वर्गात आपापसांत चर्चा होत असताना दिसत आहे.

डहाणू लोकलच्या फेऱया वाढविण्यासाठी ‘Path Not Available’ अशी कारणे नेहमीच पश्चिम रेल्वे देत असते. त्यातीलच एक कोरोना काळात बंद केलेली 7ः05ची लोकल आणि ही लोकल पुन्हा सुरू करण्यासाठी ‘PATH NOT AVAILABLE’ असेच कारण दिले

आहे, परंतु हीच लोकल डहाणू येथून सकाळी 7-05 ऐवजी 6-55 सोडल्यास कशा प्रकारे सुरू होते हे सोबतच्या तक्त्यात सविस्तरपणे दाखविण्यात आले आहे आणि संस्थेच्या माध्यमातूनसुद्धा रेल्वे अधिकाऱयांना भेटून चर्चा केली होती, परंतु पश्चिम रेल्वेची इच्छाशक्ती आड येते.

पश्चिम रेल्वेने या 7ः05च्या लोकल सुरू करण्याच्या दृष्टीने दिल्ली येथे रेल्वे बोर्डाकडे 8 फेब्रुवारी 2024 रोजी प्रपोजल पाठविल्याचे जाहीर करून प्रसारित केले आणि त्या वेळी कुठेतरी प्रवाशांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, परंतु आज एक महिना उलटूनही कुठल्याही प्रकारचा निर्णय न झाल्याने प्रवासी वर्गात शंका निर्माण झाली आहे की, प्रपोजल पाठविल्याचा फक्त देखावा होता का? अशाने प्रवाशांचा रेल्वेवरचा विश्वास दुरावत चालला आहे आणि राजकीय मंडळींबद्दलचा आदरही कमी होत चालला आहे.