प्रेरणेच्या पायवाटा – आनंदाची अनुभूती

>>डॉ. अनिल कुलकर्णी

प्रेरणा नेहमीच आनंददायी अनुभूती देते. मरगळलेल्या जीवनाला प्रेरणा ऊर्जा देते. जीवनात आनंद कुठे असतो, तर तो आपल्या अवतीभवती असतो. जीवन ही क्षणांची साखळी असते. साखळीतल्या कडीप्रमाणे प्रत्येक कडी एकसारखी असली तरी स्वतचे वेगळे अस्तित्व जपून असते. सगळेच क्षण दिसतात सारखे, पण आतून आपल्sढ वैशिष्टय़ राखून असतात. काही सुखद असतात, काही दुःखद असतात.

सुखाचे मृगजळ पाहण्याच्या नादात अवतीभवती आनंद पेरलेला आहे याचे भानच नसते. काही क्षण जीवनातला आनंद हिरावण्याचा प्रयत्न करतात. जीवन म्हणजे दुसरे आहे काय? क्षणांचा खेळच आहे. प्रत्येक क्षण वेगळा. प्रत्येक क्षण वेगवेगळ्या रंगात आपल्या समोर येतो. क्षणांना अस्तित्व असते. क्षणांना भविष्य नसते. जीवन म्हणजे दोन क्षणांमधले अंतर. जसे पावसाच्या पडणाऱया थेंबाला मोती झाल्यावर अस्तित्व असते. मातीत मिसळल्यावर अस्तित्व नसते. एक क्षण ठरवतो मोती की माती? क्षण जाणिले कुणी?

जगलेल्या क्षणांवरच माणसे पुढील जीवन जगतात. जीवन एक क्षणभंगुर चित्रपट आहे. क्षण जीवन सजवतात तसेच ते रडवतातही. हसऱया क्षणांची बेरीज व दुःखद क्षणांची वजाबाकी करता यायला हवी. सुखद क्षणांचा गुणाकार करायला हवा.
क्षणांचे कोडे सोडविता आले पाहिजे. क्षणांवर कविता करता आली पाहिजे. दुःखी क्षणांचा भागाकार करता आला पाहिजे. क्षणांचे काळ, काम, वेग, गणित जमले पाहिजे. अवघड क्षणांचे अवघड गणित चुटकीसरशी सोडविता आले पाहिजे.
सुखद क्षणांच्या मैफली रंगवता आल्या पाहिजेत. क्षणांना रंगात न्हाऊ घालता आले पाहिजे. क्षणांची रंगपंचमी खेळून सणांचा उत्सव साजरा करता आला पाहिजे. ज्याने क्षणांना जिंकले त्याने जीवनाला जिंकले. क्षणांच्या आहारी जाऊ नका. दुःखद क्षणांना दूर ठेवा.

त्यांच्याशी सोशल डिस्टन्सिंग करा. दुःखद क्षणांवर मुखवटे चढवता आले पाहिजेत. दुःखद क्षणांपासून स्वतला विलगीकरणात ठेवता आले पाहिजे. क्षणभर समाधानाच्या थांब्यावर थांबता आले पाहिजे. ऑक्टोपसप्रमाणे हव्या त्या क्षणांना बाहुपाशात घेत, दुःखद क्षणांपासून स्वतला सोडवून घेता आले पाहिजे.

प्रत्येक क्षण माणसाला घडवितो. क्षणांना कुरवाळून जीवन घडत नाही. क्षणांची आव्हाने ज्यांनी पेलली ते यशस्वी ठरले. क्षण ठरवतात तुमचे व्यक्तिमत्त्व. योग्य क्षणी योग्य निर्णय घेता आला पाहिजे. क्षण ठरवतात रंग जीवनाचे. क्षण पालटतात रंग जीवनाचे. क्षण रंगवतात रांगोळी जीवनाची. क्षण बिघडवतात रांगोळी जीवनाची.जीवन म्हणजे क्षणांची पाने असलेले पुस्तक. काही पाने आनंद देणारी, काही पाने रडवणारी. काही पाने रटाळ. क्षणाला जिंकाल तरच जीवन जिंकाल. फसव्या क्षणांनाही जिंकता आले पाहिजे. फसवे क्षण टाळले की, संयम यशाकडे नेतो. क्षणिक सुखाने जीवनाची राखरांगोळी होते. क्षण येतात, क्षण जातात. मनावर ठसणारे क्षणच जीवनावर ठसा उमटवितात. क्षणभराचे दवबिंदू, क्षणभराचा इंद्रधनुष्य हीच आपली जगण्याची प्रेरणा असते. पाऊस निनादत असतो तेव्हा ती येते तो क्षणच प्रेमाचा असतो. क्षणांना जपले की, जीवन आपले वाटायला लागते. मग आनंद उफाळून येतो. क्षणांवर हुकमत गाजवता आली की, आनंदाचे घोडे चौफेर उधळवता येतात. समाधानामध्येच जीवनातल्या आनंदाची अनुभूती घ्यायची असते.

[email protected]