शेकाप नेत्या मीनाक्षी पाटील यांचे निधन

शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचे वय 76 वर्षे होते. त्यांच्या पार्थिवावर पेझारी येथील वैपुंठभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शेकापसह सर्वपक्षीय कार्यकर्ते व असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. शेकाप नेते व आमदार जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील यांच्या त्या भगिनी तर शेकाप नेते आस्वाद पाटील यांच्या त्या मातोश्री होत.

मीनाक्षी पाटील यांना वडील प्रभाकर पाटील व काका दत्ता पाटील यांच्याकडून  बालपणापासून राजकारणाचा वारसा लाभला होता. त्यांनी पत्रकारितेतही काम केले. अलिबाग विधानसभा मतदारसंघातून 1995, 1999 आणि 2009 मध्ये त्यांनी विजय मिळवला होता. 1999 मध्ये विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्या काही काळ मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या. एक अभ्यासू नेत्या अशी मीनाक्षी पाटील यांची ख्याती होती. शेकाप संघटना मजबूत करण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. शेतकरी, श्रमिक, कामगारांसाठी त्यांनी अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला होता.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने शिवसेना नेते अनंत गीते आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली आणि पाटील कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. मीनाक्षी पाटील यांच्या पार्थिवाचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, मुश्ताक अंतुले, आर. सी. घरत यांनीही अंत्यदर्शन घेतले.

लोकाभिमुख नेतृत्व हरपले

मीनाक्षी पाटील झुंजार नेत्या होत्या. प्रत्येक जनआंदोलनात त्या अग्रस्थानी असायच्या. मीनाक्षी पाटील यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रातील एक अभ्यासू, कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले आहे,  अशा शोकभावना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केल्या.