पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 21 एप्रिलला तरी होणार का? अनेक समस्यांना आवाज उठविण्यासाठी युवासेना आक्रमक

नोंदणीकृत पदवीधर सिनेट सदस्यांशिवायच मुंबई विद्यापीठाची दुसरी सिनेट सभा उद्या 23 मार्चला होत आहे. यापूर्वी गेल्या वर्षीही पदवीधर सदस्यांशिवायच सिनेट सभा पार पडली होती. सिनेट सभेत विद्यार्थी प्रतिनिधींना हजर राहता यावे यासाठी विद्यापीठाने उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 21 एप्रिल रोजी होणार का, असा सवाल युवासेनेने उपस्थित केला आहे. तसेच विद्यापीठातील विविध समस्यांना आवाज उठविण्यासाठी युवासेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

वर्ष 2022-27 सिनेट सदस्यांचा कार्यकाळ सुरू होऊन दीड वर्ष झाले तरीही सदर सिनेटमधील मुख्य घटक असलेल्या नोंदणीकृत पदवीधर निवडणुका आजतागायत पार पडलेल्या नाहीत. पर्यायाने विद्यापीठाचा प्रमुख घटक असलेल्या विद्यार्थ्यांच्या अनेक समस्यांना सभागृहात आवाज उठवण्याकरिता प्रतिनिधीच उपलब्ध नाहीत. युवासेना माजी सिनेट सदस्यांच्या वतीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदवीधर मतदारसंघाचे आमदार विलास पोतनीस यांना युवासेनेच्या वतीने समस्यांचे निवेदन देण्यात आले.

विद्यापीठातील अनेक पदे प्रभारी

विद्यापीठाचे कुलसचिव हे प्रमुख पद प्रभारी अधिकारी चालवत आहेत. हे पद भरण्याकरिता मुलाखती पार पडूनही लायक उमेदवार सापडला नाही, की राजकीय दबावामुळे हे पद भरले नाही याबद्दल युवासेनेने साशंकता व्यक्त केली आहे. तसेच वित्त व लेखा अधिकारी, संचालक, दूरस्थ शिक्षण विभाग हे पददेखील प्रभारी अधिकारी चालवत आहेत. ही पदे तातडीने भरण्याची मागणी युवासेनेने केली आहे.