गुलदस्ता – गुरुदत्त-वहिदा रेहमान

>> अनिल हर्डीकर

चौदहवी का चाँदअसं सौंदर्य लाभलेली वहिदा रेहमान आणि हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासाता उत्कृष्ट दिग्दर्शक गुरुदत्तया दोघांच्या प्रेमाविषयी बरंच लिहिलं आणि बोललं गेलं आहे. त्यांची ही पहिली भेट अतिशय नाट्यपूर्ण. नियतीनेच घडवून आणलेली जणु कहाणी होती.

नायिकेच्या सौंदर्याचं वर्णन करणारी हजारो गाणी हिंदी चित्रपटांतून असतील, नव्हे आहेतच. पण गीतकाराने लिहिलेले शब्द, त्याला अनुरूप नायिकेचे रूप आणि ते रूप खुलवणारे नेत्रसुखद चित्रीकरण असा संगम क्वचित पाहायला मिळतो.

‘तेरी प्यारी प्यारी सूरत को किसी की नजर ना लगे’ असं राजेंद्रकुमारने म्हणावं इतकी बी. सरोजादेवी सुंदर नव्हती असं तुम्हा-आम्हाला वाटलं तरी सौंदर्य हे पाहणाऱयाच्या डोळ्यांत असतं असं म्हणतात. त्यामुळे पडद्यावरची नायिका प्रेक्षकांना भावली नाही तरी त्या नायकाला आवडली आहे असा युक्तिवाद करून दिग्दर्शक मोकळा होऊ शकतो. पण नायिकेच्या सौंदर्याची वर्णनं केलेल्या हिंदी चित्रपटांतील गीतांमध्ये शकील बदायुनी यांनी लिहिलेलं ‘चौदहवी का चाँद हो या आफताब हो…’ हे गीत अव्वल. त्याचे शब्द, कल्पना, उपमा चपखल. रफीचा मखमली, मधाळ आवाज, संगीतकार रवीची स्वररचना, गुरुदत्तसारख्या गुणी दिग्दर्शकाने कोरिओग्राफ केलेलं, कुठेही आाढस्ताळेपणा नाही आणि केवळ तिच्याचसाठी लिहिलेलं वाटावं असं वहिदाचं सौंदर्य.

चौदहवी का चाँद हो या आफताब हो,

जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो

जुल्फें है जैसे कांधों पे बादल झुके हुए

आँखें है जैसे मय के प्याले भरे हुए

मस्ती है जिस मे प्यार की तुम वो शराब हो…

आज त्या दोघांच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगतो.

1972 मध्ये पद्मश्री, 2011 मध्ये पद्मभूषण, 2021 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित झालेली वहिदा रेहमान आणि ‘सीआयडी’, ‘प्यासा’, ‘चौदहवी का चाँद’, ‘कागज के फूल’, ‘साहब, बीवी और गुलाम’सारखे दर्जेदार चित्रपट दिग्दर्शित केल्याने हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात उत्कृष्ट दिग्दर्शकांत ज्याची गणना झाली असा गुरुदत्त, या दोघांच्या प्रेमाविषयी बरंच लिहिलं आणि बोललं गेलं आहे. तर ते असो.

कोणत्याही गुणी दिग्दर्शकाला त्याला अपेक्षित असलेलं पात्र पडद्यावर किंवा रंगमंचावर साकारू शकेल अशा ताकदीचा कलाकार लाभण्यासाठी नशीब बलवत्तर असावं लागतं आणि कलाकाराला असा दिग्दर्शक लाभणं.

वसंत पादुकोणने कुणा आध्यात्मिक गुरूच्या सांगण्यानुसार  ‘गुरुदत्त’ हे नाव धारण केलं, तर वहिदा रेहमान नावाच्या केवळ 18 वर्षांच्या दाक्षिणात्य मुस्लिम नृत्यनिपुण तरुणीला चित्रपटसृष्टीतल्या अनेकांनी चित्रपटासाठी वेगळं नाव धारण करण्याची कल्पना सुचवूनदेखील तिने ती नाकारली. काय नव्हतं तिच्याकडे? रूप होतं, नृत्यनिपुणता होती आणि सरस, सहजसुंदर अभिनयदेखील.

या दोघांची भेट अतिशय नाट्यपूर्ण. नियतीनेच घडवून आणलेली. ‘बाजी’, ‘बाज’, ‘आरपार’ असे चित्रपट दिग्दर्शित करून गुरुदत्त तसा नावारूपाला आलेला होता. गुरुदत्तच्या अनेक चित्रपटांचा संवाद लेखक आणि गुरुदत्तचा जवळचा मित्र अब्रार अल्वी हे दोघे हैदराबादच्या एका वितरकाकडे गेले होते. त्यांनी रस्त्यात एका सुस्वरूप तरुणीला पाहिलं, जिच्याकडे रस्त्यात तिचे चाहते कौतुकाने पाहत होते. चाहत्यांकडून दोघांना तिचं नाव कळलं.वितरकाकडे गेल्यावर दोघांनी तिच्याविषयी विचारलं,  तर तो वितरक म्हणाला की, ती खूप चांगली नर्तिका आहे आणि तिचं  भरतनाट्यमचं शिक्षण झालंय. सध्या ती एका तेलुगू चित्रपटातील नृत्यामुळे चर्चेत आहे. योगायोगाने गुरुदत्त नव्या चित्रपटासाठी नव्या चेहऱयाच्या शोधात होता. गुरुदत्तच्या सांगण्यावरून वितरकाने वहिदाला आमंत्रण धाडां. ती आली, पण तिने जिंकलं नाही. तिच्या व्यक्तिमत्त्वाचा काहीच परिणाम गुरुदत्तवर झाला नाही. गुरुदत्तने तिला काही जुजबी प्रश्न विचारले ते केवळ विचारायचे म्हणून. ती गेली. गुरुदत्त त्या वितरकाला म्हणाला, “इथल्या प्रेक्षकांना हिच्यात एवढं काय दिसलं तेच मला कळत नाही!” त्यावर वितरक मित्र म्हणाला, “तू तिला पडद्यावर पाहिलं नाहीस म्हणून तू असं म्हणतो आहेस.” एवढं म्हणून तो वितरक थांबला नाही. त्याने केवळ गुरुदत्तसाठी वहिदाच्या गाजत असलेल्या ‘रोजुलो मराई’ या चित्रपटाचा खास शो आयोजित केला. पडद्यावर वहिदाला पाहिलं आणि गुरुदत्तची अवस्था ‘युरेका युरेका’ झाली. तो ज्या चेहऱयाच्या शोधात होता, तोच त्याला गवसला होता. प्रथमदर्शनी प्रेमात न पडलेल्या गुरुदत्तला तिच्यातला चार्म दिसला तो पडद्यावरच्या रंगरुपात. ‘सी आयडी’ या चित्रपटाच्या नायिकेच्या… कामिनीच्या भूमिकेसाठी तिची निवड करण्यात आली. पुढचं सगळं सगळ्यांना माहीत आहे.

नियती किती सुंदर जोड्या जमवत असते. जिन्दगी इत्तेफाक है… सर्व योगायोगाच्या गोष्टी! ‘कागज के फूल’ या चित्रपटाची कथाकल्पना, शोकांतिका हीच वहिदा-गुरुदत्तच्या आयुष्याची कहाणी आहे, असं म्हणतात.

[email protected]

(लेखक पटकथा, संवादलेखक आहेत.)