बजेटची होळी, महागाईची धुळवड! पुरणपोळीचा खिशाला चटका; रंग पिचकाऱ्या महागल्याने हिरमोड

होळी सणासाठी मोठय़ा उत्साहाने पुरणपोळीचा बेत करणाऱया गृहिणींना सर्वच किराणा साहित्य महागल्याने पोळीचा चांगलाच चटका बसणार आहे. तर रंगपंचमीसाठी लागणाऱया रंगांपासून पिचकाऱयाही महागल्याने लहानथोरांचा हिरमोड झाला आहे. या साहित्याचे दर 10 ते 20 टक्क्यांनी वाढल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.

होळीमध्ये नारळ अर्पण करून ईडापिडा टळो, सुखाचे दिवस येवो, अशी प्रार्थना केली जाते. मात्र महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट मात्र कोलमडले आहे. चणाडाळ, गूळ, मैदा, तुपासह कडधान्य, डाळींच्या किमतीत पाच टक्क्यांपासून 20 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. 20 रुपयांपर्यंत विकत मिळणाऱया एका पुरणपोळीची किंमत 30 ते 35 रुपये झाली आहे.

यंदाच्या उत्सवाला महागाईचा फटका बसला असून पिचकारींच्या किमतीत 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे गिऱहाईकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. रंगपंचमीचा सण अवघ्या एक दिवसावर आला तरी अजूनही बराच माल शिल्लक आहे.
z योगेश शहा, दुकानदार

याआधी दहा ते बारा दिवस अगोदरच रंग आणि पिचकारीची विक्री करणारे स्टॉल्स लागायचे. यंदा तीन दिवस आधी स्टॉल्स लावूनदेखील म्हणावी तशी गर्दी नाही. हर्बल रंगही दहा ते वीस टक्क्यांनी वाढलेत. त्यामुळे गिऱहाईक खरेदी कमी करते.
z रमेश शिंदे, दुकानदार

हर्बल रंग, कार्टून पिचकारींची चलती

चिनी वस्तूंवर घातलेल्या बंदीमुळे संपूर्ण बाजार ‘मेड इन इंडिया’ पिचकारींनी व्यापला आहे. शॉकर, गन, सॅक अशा विविध प्रकारच्या पिचकारी 20 ते 500 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. छोटा भीम, स्पायडरमॅन, बार्बी अशा कार्टूनची छबी असलेल्या पिचकारींना बच्चेकंपनीची पसंती आहे. ‘चांद्रयान 2’ मोहिमेमुळे यंदा नव्याने दाखल झालेल्या एस्ट्रोनॉट पिचकाऱया बाजारात लक्ष वेधून घेत आहेत. रासायनिक रंग आरोग्याला घातक असल्यामुळे हर्बल रंगांची ग्राहकांकडून विचारणा होत आहे.